देशासाठी शिवसेना-भाजपा एकत्र आले आहेत. मतभेद असले तरी आमच्या काही भूमिका आणि मागण्या आहेत. युती झाली नसती तर दोन्ही पक्ष नेस्तनाबूत झाले असते, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले. त्याचबरोबर युती का झाली, हा प्रश्न भाजपाला का विचारला जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘बीबीसी मराठी’च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. युतीचे सरकार सत्तेवर असूनही मागील पाच वर्षांत शिवसेनेचा भाजपाबरोबर संघर्ष राहिला. युती होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि अखेरच्या क्षणी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीसाठीची युती जाहीर केली. यावर राऊत यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिले.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या २१० जागा निवडून येतील, असे भाकितही त्यांनी केले.  आदित्य ठाकरेंनी लोकसभा लढवायची की नाही, हे त्यांनी ठरवावे. त्यांच्यासाठी कोणताही मतदारसंघ आम्ही मोकळा करू शकतो, असे ते म्हणाले.