जर विरोधी पक्षांना वाटत असेल की भाजपा एक धोकादायक पक्ष आहे, तर निश्चितच असं असू शकतं, असं विधान दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण रजनीकांत यांची भाजपाशी जवळीक मानली जात आहे. चेन्नईच्या विमानतळावर माध्यमांसी बोलताना त्यांनी हे विधान केले.

आगामी २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपाचा सामना करण्यासाठी विरोधीपक्षांकडून महाआघाडीचा प्रयत्न सुरु आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. मात्र, आपल्या या विधानानंतर आगामी निवडणुकीत रजनीकांत नक्की कोणाच्या बाजूने असतील याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आपले पत्ते अजूनही त्यांनी राखून ठेवल्याचे बोलले जात आहे.

पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की त्यांचा राजकीय पक्ष मक्कल मंदरम (आरएमएम) भाजपाशी हात मिळवणी करणार आहेत की ती केवळ अफवा आहे. दरम्यान, नोटांबदीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी भाजपावर टीका करण्यापासून स्वतःचा बचाव केला. ते म्हणाले, सरकारने देशभरात केलेली नोटाबंदी योग्य नव्हती. मात्र, आता ही गोष्ट होऊन गेली असली तरी त्यावर अधिक चर्चा व्हायला हवी.

तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेने सुपरस्टार रजनिकांत यांच्यावर टीका करताना त्यांना भाजपाच्या हातातील खेळण असल्याची टीका केली होती. त्याचबरोबर ते आपल्या चाहत्यांना लाज आणत असल्याचा आरोपही डीएमके यांनी केला आहे.

रजनिकांत यांच्या राजकीय भविष्याबाबत अनेक अंदाज लावले जात आहेत. रजनीकांत यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत आपल्या राजकारणात येण्याची घोषणा केली होती. मात्र, तरीही त्यांनी अद्याप आपल्या राजकीय पक्षाला पूर्णपणे लॉन्च केलेले नाही. येत्या १२ डिसेंबर रोजी ते आपल्या वाढदिवसादिवशी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करु शकतात असे सुत्रांकडून कळते.