ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि एआयएमआयएममध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी ओवेसी बंधू हैदराबादचा विकास कधीच करणार नाहीत ते केवळ रोहिंग्या मुस्लिमांना भारतात प्रवेश देतील अशी टीका केल्यानंतर आता एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावरुन भाजपाचे मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. जर तुम्ही ३० हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद असल्याचे सांगत आहात तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एवढं सगळं होईपर्यंत झोपा काढत होते का?, असा टोला ओवेसींनी लगावला आहे. सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना ओवेसींनी शाह यांच्यावर निशाणा साधला.

एक डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजपाने या निवडणुकींसाठी आपली संपूर्ण ताकद लावली आहे. भाजपाचे अनेक नेते या निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत आहेत. तर दुसरीकडे एआयएमआयएमनेही निवडणुकीचा प्रचार सुरु केला आहे. अशाच एका प्रचारसभेमध्ये भाजपाचा खासदार तेजस्वी सूर्या यांनी रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन केलेल्या आरोपांना ओवेसींनी उत्तर दिलं. “तर मतदार यादीमध्ये ३० हजार रोहिंग्यांची नोंद आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय करत आहेत? ते झोपा काढत आहेत का? ३० ते ४० हजार रोहिग्यांची नोंद मतदार यादीमध्ये कशी झाली याकडे लक्ष देण्याचं काम त्यांच नाही का? भाजपाचे दावे खरे असतील तर त्यांनी उद्या (मंगळवार) संध्याकाळपर्यंत अशा एक हजार नावांची तरी यादी द्यावी,” असं आव्हानच ओवेसींनी भाजापाच्या नेत्यांना केलं आहे.

“द्वेष निर्माण करणं हाच भाजपाचा मुख्य हेतू आहे. हा वाद हैदराबाद आणि भाग्यनगरमध्ये आहे. आता कोण जिंकणार हे तुम्हीच ठरवणार आहात,” असंही एआयएमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी म्हटलं आहे.

असदुद्दीन ओवेसींनी काही दिवसांपूर्वीच भाजपावर टीका करताना या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरु असल्याचा आरोप केला होता. हैदराबादमध्ये पूरजन्य परिस्थिती होती तेव्हा केंद्राने काय केलं असा सवालही ओवेसी यांनी केंद्र सरकारला विचारला होता. “तुम्ही भाजपा नेत्यांना रात्री झोपेतून उठवलं आणि काही विचारलं तर ते लोकं ओवेसी गद्दार, दहशतवादी आणि पाकिस्तानी आहे, असंच सांगतील. मात्र भाजपाने हे सांगितलं पाहिजे की मागील वर्षी तेलंगण खास करुन हैदराबादला त्यांनी कोणती आर्थिक मदत केली? हैदराबादमध्ये पूर आला तेव्हा मोदी सरकारने काय मदत केली? त्यावेळी त्यांनी काहीच मदत केली नव्हती म्हणून आता हा धार्मिक मुद्दा निर्माण केला जात आहे,” असा टोलाही ओवेसींनी लगावला होता.

काय म्हणाले होते तेजस्वी सूर्या

सोमवारच्या एका सभेमध्ये सूर्या यांनी ओवेसींनी विकासाच्या गोष्टी करणं हस्यास्पद असल्याचा टोला लगावला होता. “ओवेसी बंधू कधीच जुन्या हैदराबादचा विकास करणार नाही. ते केवळ रोहिंग्या मुस्लिमांना भारतात प्रवेश देतील. ओवेसींना मिळणारं प्रत्येक मत हे भारताच्या विरोधात पडणार मत असेल. असदुद्दीने ओवेसी हे विक्षिप्त इस्लाम, विभाजनवाद आणि टोकाच्या विचारसरणीच्या गोष्टी करतात याच गोष्टी मोहम्मद अली जिन्नाही करायचे,” अशा शब्दांमध्ये सुर्या यांनी ओवेसी बंधुंवर निशाणा साधला.

हैदराबाद पालिका निवडणुकीमध्ये वर वर दोन पक्षांमधील लढाई दिसत असली तरी एआयएमआयएम, भाजपाबरोबरच टीएमसीही या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचे निकाल ४ डिसेंबर रोजी लागणार आहेत.