केंद्रात आणि बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) डबल इंजिन असेल तर धडाक्यात विकास होईल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारमधील तीन सभांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मते देण्याचे आवाहन केले. गेल्या पंधरा वर्षांत पहिल्यांदाच मोदी यांनी नितीशकुमार यांच्यासाठी प्रचार केला.

बिहारमधील एनडीएतून ‘लोकजनशक्ती’ बाहेर पडल्यानंतर भाजप आणि जनता दल (सं) यांच्यात बेबनावाचे चित्र निर्माण झाले होते. लोकजनशक्तीचे सर्वेसर्वा चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांच्यावर सातत्याने टीका करताना मोदी आणि भाजपवर स्तुतिसुमने उधळली होती. प्रचारसभांमध्ये सोबत असलेल्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचे कौतुक केले, मात्र चिराग पासवान यांचा उल्लेख  टाळला.

नितीशकुमार यांच्याबरोबर मला तीन-चार वर्षेच काम करता आले. ज्यांनी बिहारला ‘बिमारू’ आणि लाचार बनवले त्यांची सत्ता २००५ मध्ये नितीशकुमार यांनी हिसकावून घेतली. त्यामुळे तत्कालीन सत्ताधारी (राजद व काँग्रेस) प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांनी केंद्रात  यूपीए सरकार आल्यावर १० वर्षे नितीशकुमार यांना त्रास दिला. मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून आणि नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून अनेकदा दिल्लीत केंद्र सरकारच्या बैठकांत सहभागी झालो. नितीशकुमार यांनी यूपीए सरकारला, बिहार हा राजकारणाचा आखाडा बनवू नका, असे कळकळीने सांगितले. यूपीए सरकारने नितीशकुमार यांची १० वर्षे बरबाद केली. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर १८ महिने नितीशकुमार हे लालू प्रसाद यांच्या राजदसोबत राहिले, पण त्यांना राजदची साथ सोडावी लागली. मग, नितीशकुमार आणि भाजपने पुन्हा सरकार बनवले, असे सांगत मोदींनी नितीशकुमार यांना अप्रत्यक्षपणे भाजपची अपरिहार्यता दाखवून दिली.