करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही पण जर आपण करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळले तर आपण कोणत्याही संभाव्य व्हेरिएंटपासूनही वाचू शकतो, असं प्रतिपादन दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केलं आहे. डेल्टा व्हेरिएंटबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसल्याने तो जास्त संसर्गजन्य आहे की त्याच्यामुळे अधिक मृत्यू होत आहेत असं सांगता येणार नाही असंही ते म्हणाले.

या नव्या व्हेरिएंटबद्दल बोलताना एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, कोणताही नवा व्हेरिएंट जरी आला तरी करोना प्रतिबंधाचे नियम पाळल्याने आपण त्याच्यापासून वाचू शकतो. करोनापासून संरक्षण व्हावं यासाठी मास्क वापरणं, स्वच्छता पाळणं, विशेषतः हात वारंवार धुणं, सुरक्षित अंतर राखणं अशा उपायांचं पालन करण्याच्या सूचना वारंवार केल्या जात आहेत.


देशात सध्या करोनाचा नवा प्रकार डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. करोना विषाणूच्या या नव्या प्रकारामुळे प्रतिकारशक्ती वेगाने निष्प्रभ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जगभरातील देशांनी या प्रकाराची धास्ती घेतली असताना भारतातल्या १० राज्यांमध्ये प्रामुख्याने डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहेत.

हेही वाचा- काळजी घ्या, Delta Variant करोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO चा इशारा!

त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आत्तापर्यंत आढळून आल्यामुळे चिंता वाढली असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा प्लसचा मूळ व्हेरिएंट असलेला डेल्टा व्हेरिएंट जगभरात आजपर्यंत सापडलेल्या विषाणूंमध्ये सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जगभरातल्या नागरिकांनी देखील मास्क घालून ठेवणं आवश्यक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.