करोनाचा सामना करण्यासाठी सध्या अनेक देशांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतही लसीकरण मोहीम सुरु असून यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे. लसीकरण पूर्ण झालं असेल त्यांनी आता मास्क घालण्याची आवश्यकता नसल्याचं जो बायडन यांनी सांगितलं आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (सीडीसी) यासंबंधी मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्यात आली असून त्याचा उल्लेख करत त्यांनी ही माहिती दिली.

सीडीसीने नव्याने मार्गदर्शक तत्वं जाहीर केली असून लसीकरण पूर्ण झालेल्यांनी मास्क घालण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे. मात्र यावेळी त्यांनी ज्यांचं अद्यापही लसीकरण झालेलं नाही त्यांनी अंतिम टप्पा गाठेपर्यंत आपली सुरक्षा करणं गरजेचं असल्याचंही नमूद केलं आहे.

व्हाईट हाऊसमध्ये बोलताना बायडन यांनी सांगितलं की, “काही तासांपूर्वीच सीडीसीने आपण पूर्ण लसीकरण केलेल्या लोकांना आता मास्क घालण्याची गरज नसल्याची शिफारस केली आहे. ही शिफारस खरी असून घरात किवा घराबाहेर दोन्हीकडे लागू आहे. मला वाटतं हा मोलाचा टप्पा आहे. एक मोठा दिवस असून नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरण केल्यानेच हे यश संपादन करणं शक्य झालं आहे”.

“गेल्या १४४ दिवसांपासून आपण लसीकरण करत असून जगाचं नेतृत्व केलं आहे. संशोधक, शास्त्रज्ञ, औषध कंपन्या, लष्कर, फेमा, डॉक्टर्स, परिचारिका, द नॅशनल गार्ड, गव्हर्नर अशा अनेकांच्या मेहनतीमुळे हे शक्य झालं आहे. जास्तीत जास्त अमेरिकन नागरिकांचं लसीकरण व्हावं यासाठी आकाश आणि जमीन एक करणाऱ्या प्रत्येकामुळे हे शक्य झालं,” असं बायडन यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “एक दिवस येईल जेव्हा गमावलेल्या प्रिय व्यक्तीची आठवण आपल्या डोळ्यांत अश्रू आणण्याआधी चेहऱ्यावर स्मितहास्य आणेल”. बायडन यांनी यावेळी अद्यापही लसीकरण न झालेल्यांनी मास्क घालण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं आहे.

“आपण इतक्या दूरपर्यंत आलो आहोत, त्यामुळे जोपर्यंत आपण अंतिम रेषेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपली सुरक्षा करा. कारण ही मोठी घोषणा असून, आपली निराशा होऊ नये अशी इच्छा आहे. करोना संकट किती कठीण होतं याची आपल्याला कल्पना आहे. प्रत्येकाचं लसीकरण होणं हीच सर्वात सुरक्षित बाब आहे,” असं आवाहन बायडन यांनी यावेळी केलं.

सीडीसीने बुधवारी पूर्ण लसीकरण झालेल्यांनी आता घऱात किंवा घराबाहेर मास्क घालण्याची गरज नसल्याचं जाहीर केलं आहे. तसंच कोणत्याही निर्बंधांविना आपल्या दैनंदिन गोष्टी ते सुरु करु शकतात असंही सांगितलं आहे.