News Flash

“काँग्रेसचं धोरण पटत नसेल तर पक्ष सोडा आणि मोकळे व्हा”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचा कपिल सिब्बल यांना खोचक सल्ला

बिहार निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली नाही असं म्हणत काँग्रेसने आता अंतर्मुख होऊन विचार करायला हवा असा सल्ला कपिल सिब्बल यांनी दिला. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी कपिल सिब्बल यांच्यावर टीका केली आहे. ज्यांना पटत नसेल त्यांनी पक्ष सोडून बाहेर जावं असाही सल्ला एका मुलाखतीत सलमान खुर्शीद यांनी दिला आहे.  सलमान खुर्शीद यांनी एक भलीमोठी फेसबुक पोस्ट लिहून कपिल सिब्बल यांना ‘डाऊटिंग थॉमस’ म्हणजेच सदैव संशय घेणारा व्यक्ती असं म्हटलं आहे. त्याआधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही सिब्बल यांच्यावर टीका केली होती. अंतर्गत गोष्टी चव्हाट्यावर आणण्याची गरज नव्हती असं गेहलोत यांनी म्हटलं होतं. आता कपिल सिब्बल यांच्यावर सलमान खुर्शीद यांनी टीका केली आहे.

सलमान खुर्शीद यांनी फेसबुक पोस्टची सुरुवात करताना मुघल बादशाह बहादुर शाह जाफर यांची एक शायरीही लिहिली आहे. ‘न थी हाल की जब हमें खबर, रहे देखते औरों के ऐबो हुनर, पडी अपनी बुराइयोंपर नजर, तो निगाह में कोई बुरा न रहा’ अशी सुरुवात करत खुर्शीद यांनी भली मोठी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. सत्तेतून बाहेर असणं हे सार्वजनिक आयुष्याता स्वीकार करणं सोपं नाही. मात्र जनमतानेच जर तो कौल दिला असेल तर ती बाब आपण स्वीकारली पाहिजे. सत्ता मिळवण्यासाठी आपल्या तत्त्वांशी तडजोड करावी लागणार असेल तर त्यापेक्षा अशी सत्ता सोडलेली बरी असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते कपिल सिब्बल?

“बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाला फारसे गांभीर्य नाही. या पराभवानंतर पक्ष नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर आलेले नाही. कदाचित सगळं काही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे असे पक्ष नेतृत्वाला वाटत असावे. आपल्या पक्षाची मोठी घसरण होते आहे ही बाबत काँग्रेसने सर्वात आधी स्वीकारायला हवी. आपलं कुठे चुकतं आहे? हे काँग्रेसला चांगलेच ठाऊक आहे. मात्र त्याबाबत कोणीही काहीही बोलायला तयार नाही. हे असेच सुरु राहिले तर भविष्यात काँग्रेसचा आलेख आणखी खाली घसरत राहिल” अशीही भीती कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 9:54 pm

Web Title: if you do not agree with the policy of the congress leave the party says salman khurshid to kapil sibbal scj 81
Next Stories
1 लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात, आरबीआयने घातले निर्बंध
2 ‘जो बायडेन लादेनवर हल्ला करण्याच्या विरोधात होते’ ओबामांचा खळबळजनक खुलासा
3 मोसादच्या ‘या’ खतरनाक युनिटने इराणमध्ये घुसून संपवलं मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला
Just Now!
X