दिल्लीतील शिक्षण विभागाच्या संचालकांचा एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्कींगवर प्रचंड व्हायरल झाला आहे. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांना सल्ला देताना दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाच्या संचालकांनी मुलांना परीक्षेत सर्व प्रश्नांची उत्तरे लिहा असा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे उत्तर ठाऊक नसेल तर प्रश्नच पुन्हा लिहून या असंही या व्हिडीओमध्ये संचालकांनी मुलांना सुचवलं आहे. त्यामुळे या व्हिडीओची सध्या दिल्लीतील शैक्षणिक वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये उदित प्रकाश राय हे एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहे. मी शिक्षक आणि केंद्रीय शिक्षण विभागाशीही बोललो असून त्यांना विद्यार्थ्यांनी काहीही लिहिलं तरी गुण द्यावेत असं सांगितलं आहे. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नच लिहून काढला तरी त्यांना गुण देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे राय सांगताना दिसत आहे.
“जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर ठाऊक नसेल तर आपण काय करणार? आपण कोणताही प्रश्न सोडून द्यायचा नाही. आपल्याला प्रश्नाचं उत्तर ठाऊक नसेल तर आपण उत्तराच्या जागी पुन्हा प्रश्नच लिहायचा. काहीही झालं तरी प्रश्न सोडायचा नाही. काहीही, तुम्हाला समजेल त्यापद्धतीने लिहा. तुम्हाला काहीही समजत नसेल तर प्रश्नपत्रिकेवर जो प्रश्न आहेत तोच उत्तर म्हणून लिहून काढा. पण कोणताही प्रश्न सोडू नका. मी तुमच्या मॅडमशी बोललो आहे. त्यांनी तुम्ही काहीही लिहलं तरी गुण दिले जातील अशं सांगितलं आहे. आम्ही सीबीएसईलाही सांगितलं आहे की मुलांनी काहीही लिहिलं तरी त्यांना गुण द्या,” असं राय यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना म्हटलं आहे. हाच व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
या व्हिडीओसंदर्भात द इंडियन एक्सप्रेसने अनेकदा राय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आलं नाही. शिक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राय यांच्यावतीने स्पष्टीकरण देताना त्या वाक्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये असं म्हटलं आहे. तसेच राय यांनी हे वक्तव्य मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी केलं होतं असंही म्हटलं आहे. “हे शैक्षणिक वर्ष खूपच निराशाजनक राहिलं आहे. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी ते त्यांच्याशी चर्चा करत होते. अनेक विद्यार्थ्यांना आता लिहिण्याची सवय राहिलेली नाही. ते खूपच थेटपणे मुलांशी संवाद साधत होते आणि त्यांना या वक्तव्यामुधून मुलांनी निराश होऊ नये असं सांगायचं होतं. मुलांनी सीबीएसइ किंवा इतर गोष्टींची चिंता करु नये, असं त्यांना म्हणायचं होतं,” असं स्पष्टीकरण वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलं आहे.
दिल्लीमध्ये दहावी आणि बारावीचे विद्यार्थी १८ जानेवारीपासून नियमितपणे वर्गात जाऊ लागले आहेत. १ एप्रिल पासून दहावी तर मार्चपासून १२ वीचे विद्यार्थी बोर्डाच्या पूर्व परिक्षा देणार आहेत. तर चार मेपासून बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 8:37 am