आपल्याकडे व्हिक्टोरिया स्मारक आहे मग मोहम्मद अली जिना यांचे चित्र असेल तर त्यात गैर काय? हे मत आहे भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे. अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी व्हाईस चान्सलर राहिलेल्या हमीद अन्सारी यांना जिना यांच्या फोटोवरुन झालेल्या वादाबद्दल विचारले असता ते म्हणाले कि, मोहनदास करमचंद गांधी यांना सन्मानित करण्यात आले. त्यांचा फोटो तिथे आहे.

पंतप्रधान मोरारजी देसाई, मदर तेरेसा, खान अब्दुल गफ्फार खान या सर्वांना सन्मानित करण्यात आले. त्यांची चित्रे पोट्रेट गॅलरीत आहेत. जिना यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले त्यामुळे त्यांचा फोटो अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये आहे. जीना यांनी कुठली विचारधारा मांडण्याआधी ते तिथे गेले होते. १९३८ मध्ये जीना अलीगड मुस्लिम विद्यापीठात गेले होते. त्यांचा फोटो तिथे असेल तर गैर काय ? उच्च न्यायालयाच्या इमारतींमध्ये ब्रिटीश न्यायमूर्तींचे फोटो आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आतमध्ये जीना यांचा फोटो असल्याचे कोणीतरी मला सांगितले आहे. मी कधी मुंबई उच्च न्यायालयात गेलेलो नाही, अशा विषयांवरुन वाद निर्माण करणे म्हणजे पोरकटपणा आहे असे हमीद अन्सारी म्हणाले. भारताची जी कल्पना आहे त्याला धोका निर्माण झाला आहे या अमर्त्य सेन यांच्या विधानाशी आपण सहमत आहात का ? या प्रश्नावर अन्सारी म्हणाले कि, निश्चित भारत म्हणजे सर्वसमावेशकता. आज या विचाराला धोका निर्माण झाला आहे.