सध्या करोनाच्या संकटामुळे लोकांमध्ये काहीशा प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी अफवाही पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. झारखंडमधील गढवा येथील मेरालमध्येही अशीच अफवा पसरली. एक होती करोनाबाबत तर दुसरी होती पैशांबाबत. सूर्याची उपासना केल्यावर करोनाचा प्रादुर्भाव नष्ट होतो, अशी एक अफवा या ठिकाणी पसरली होती. तर दुसरी म्हणजे कलशावर आधार कार्ड ठेवून पूजा केल्यानंतर सरकार आपल्या खात्यात पैसे जमा करता. पाहता पाहता या अफवा संपूर्ण गावभर पसरल्या आणि मेरोल व मझिगाव परिसरात नदीच्या किनारी महिला कलश आधारकार्ड घेऊन त्याची पूजा करतानाही दिसू लागल्या.

करोनाचं संकट पळवून लावण्यासाठी आम्ही सूर्य देवतेची पूजा केली आहे, असं यूरिया नदी किनारी पूजा करणाऱ्या काही महिलांनी सांगितलं. तसंच आम्ही करोनाला वाहून घेऊन जा, अशी प्रार्थनाही आम्ही केली असल्याचं त्या म्हणाल्या. दैनिक जागरणनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. आधार कार्ड कलशावर ठेवून त्याची पूजा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्या खात्यात पैसे जमा करतील, असंही आधार कार्डाची पूजा करणाऱ्या महिलांनी सागितलं. आधार कार्ड कलशावर ठेवून पूजा केल्यानं तसंच करोनाला पळवण्यासाठी उपवास करण्यासंबंधी गावात काही अफवा परसल्या होत्या असं महिलांद्वारे अशा प्रकारे पूजा करण्यासंबंधी बोलताना हासनदाग पंचायतीच्या प्रमुखांनी सांगितलं.

पंचायतीचे प्रमुख गावातील काही लोकांना सोबत घेऊन गावकऱ्यांना ही अफवा असल्याचं समजावण्याचे प्रयत्न करत आहेत. तसंच सूर्याची पूजा करून ना करोना जाणार आहे ना आधार कार्डाची पूजा करून खात्यात रक्कम जमा होणार आहे, असं ते सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, एकमेकांपासून काही अंतर ठेवूनच उभं राहणं किंवा बाहेर पडताना आपला चेहरा ढाकून बाहेर पडणं यामुळेच करोना दूर राहू शकतो, असंही ते सर्वांना सांगत आहेत.