भारताच्या एका सर्जिकल स्ट्राइकला पाकिस्तान १० वेळा उत्तर देईल असे धमकीवजा चिथावणीखोर विधान नुकतेच पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केले होते. पाकिस्तानच्या या धमकीला खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सडेतोड उत्तर दिले असून पाकने सर्जिकल स्ट्राइकचा प्रयत्न करुन बघावा पाकिस्तानचे अस्तित्व दिसणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

स्वामी म्हणाले, रस्त्यावरील मवाल्यासारखी वक्तव्ये पाकिस्तान करत आहे. जो पोलिस आल्यानंतर पळून जातो, अशा बदमाशासारखे पाकिस्तानचे वागणे आहे.आम्ही करुन दाखवलं आता तुम्ही करुन दाखवावं असे आव्हानही त्यांनी यावेळी पाक लष्कराला दिले.

‘भारताच्या एका सर्जिकल स्ट्राइकला पाकिस्तान १० वेळा उत्तर देईल’

दरम्यान, राफेल डीलवरुन राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना स्वामी म्हणाले, राहुल गांधी काहीही बोलू शकतात. मात्र, त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही. जर असे असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन तक्रार दाखल करायला हवी.

त्याचबरोबर सबरीमाला मंदिरात महिला प्रवेश करणार असतील तर आत्महत्येची धमकी देणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांबाबत बोलताना स्वामी म्हणाले, शिवसेना कोण आहे? केरळची शिवसेना खरी शिवसेना नाही. त्यांना आत्महत्या करु द्या. काही लोकांच्या आत्महत्या केल्याने नियम बदलू शकत नाहीत. आम्ही कोणालाही जबरदस्तीने मंदिरात जायला सांगत नाही आहोत. मदिरात जाण्याचा केवळ पर्याय देण्यात आला आहे. जर आपल्याला जायचे आहे तर जाऊ शकता. महिलांनी काय करायला हवे आणि काय नाही हे निश्चित करणारी शिवसेना कोण असा सवालही त्यांनी यावेळी केला.