चांगले रस्ते हवे असतील, तर टोल द्यावाच लागेल, असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी टोल संपूर्णपणे बंद करता येणार नाही, याचा गुरुवारी पुनरुच्चार केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचारामध्ये टोल बंद करण्याचे आश्वासन देणाऱया गडकरी यांनी या विषयावरून पूर्णपणे घुमजाव केले असून, टोल बंद करता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी टोलचे समर्थन केले. ते म्हणाले, टोल न आकारता रस्ते बांधणे सरकारला सध्या शक्य नाही. जर लोकांना चांगले रस्ते हवे असतील, तर त्यांना टोल द्यावाच लागेल. टोल नसता तर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू मार्ग यासह इतर अनेक रस्ते आणि उड्डाण पूल आजही पूर्ण झाले नसते. टोल आकारणी करता येणार असल्यामुळे हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यामुळे टोल बंद करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी संसदेमध्येही गडकरी यांनी टोल बंद करता येणार नसल्याची भूमिका मांडली होती.