देशातील शिक्षणसंस्थांमध्ये आयआयटी मुंबई सर्वोत्तम असल्याचे ‘क्यू एस रँकिंग’ या जागतिक मानांकन संस्थेने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी आयआयटी मुंबईने क्रमवारीत हे स्थान पटकाविले आहे.

जगभरातील सर्वोत्तम २०० शिक्षण संस्थांची नावे ‘क्यू एस रँकिंग’ने प्रकाशित केली आहेत. त्या क्रमवारीत आयआयटी मुंबई १५२व्या स्थानी, आयआयटी दिल्ली १८२व्या स्थानी तर बेंगळूरुची ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ १८४व्या स्थानी आहे. २३ भारतीय संस्थांपैकी चार संस्थांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत क्रमवारीत वरचे स्थान मिळवले आहे. सात संस्थांना मात्र या यादीत टिकाव धरता आलेला नाही.

आयआयटी मुंबईचे स्थान तेथील संशोधनामुळे वाढले आहे. विशेष म्हणजे निव्वळ प्रयोगशाळेपुरत्या मर्यादित राहणाऱ्या संशोधनाचा विचार या क्रमवारीत केला जात नाही. तर ज्या संशोधनाने अर्थकारणाला आणि जीवनमान उंचावण्याला चालना मिळते त्या संशोधनाचा विचार केला जातो. त्या अनुषंगाने आयआयटी मुंबईतील संशोधनाच्या उपयुक्ततेची पातळी ही जागतिक किमान दर्जापातळीपेक्षा अधिक असल्याने त्यांचे स्थान पक्के राहिले आहे.

मॅसॅच्युसेट्स् विद्यापीठ सर्वोच्च स्थानी

जगातील एक हजार विद्यापीठांमध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स् विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे याच विद्यापीठातील ‘मॅसॅच्युसेट्स् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेने तब्बल आठ वर्षे सर्वोत्तम शिक्षण संस्थेचे स्थान कायम राखले आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ही दोन्ही विद्यापीठे जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असून आशियात सर्वोत्तम क्रमवारीत आहेत.

क्यू एस रँकिंग म्हणजे काय?

क्वॅकरेली सायमंडस् या शिक्षण क्षेत्रातील जाणकार ब्रिटिश कंपनीतर्फे जगभरातील विद्यापीठांची आणि शिक्षणसंस्थांची वार्षिक क्रमवारी ‘क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ या वार्षिकांकात प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे या क्रमवारीला ‘क्यूएस रँकिंग’ असेच नाव पडले आहे.