इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या केंद्रीय शैक्षणिक संस्था २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात कुठल्याही अभ्यासक्रमासाठी ट्युशन फी वाढवणार नाहीत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी रविवारी दिली.

पोखरियाल म्हणाले, “आयआयटी परिषदेच्या स्थायी समितीचे चेअरमन आणि आयआयटीजच्या सर्व संचालकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात आला की, या शैक्षणिक संस्था २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी कुठल्याही कोर्ससाठीची ट्युशन फी वाढवणार नाहीत.”

तर आयआयआयटीज संदर्भात सांगताना ते म्हणाले, “ज्या केंद्रीय अनुदानित संस्था आहेत. ज्यांमध्ये अंडरग्रॅज्युएट कोर्सेससाठी नेहमी १० टक्के शुल्कवाढ केली जाते ती या वर्षी केली जाणार नाही. त्याचबरोबर इतर कोर्ससाठी देखील त्यांनी फी वाढ करु नये अशी विनंती मी त्यांना केली आहे.”

त्याचबरोबर ज्या आयआयआयटी या पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर चालवल्या जातात त्या देखील पुढील शैक्षणिक वर्षासाठी त्यांच्या कुठल्याही कोर्ससाठी फी वाढ करणार नाहीत, असंही केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल यांनी स्पष्ट केलं.