५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरात अंधार करुन ९ मिनिटांसाठी दिवा किंवा मेणबत्ती पेटवा, अगदीच शक्य नसेल तर मोबाइल टॉर्च सुरु करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यावरुन आता काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे देशाची एकी दाखवण्याठी मीदेखील एक दिवा पेटवेन. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका निराशाजनक आहे. त्यांच्याकडून देशाला यापेक्षा जास्त अपेक्षा आहेत असंही शशी थरुर यांनी स्पष्ट केलं. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

देशातल्या जनतेला, गरीबांना एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. लॉकडाउनमुळे हातावरचं पोट असलेल्या कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत. राष्ट्र अडचणीत असताना मोदींकडून अधिकाधिक चांगल्या घोषणांची अपेक्षा आहे. मात्र या पातळीवर विचार केला तर सध्याची मोदींची भूमिका निराशाजनक आहे. मोदींकडून राष्ट्राला यापेक्षा जास्त अपेक्षा आहेत.

“देशावर करोनाचं संकट घोंघावतं आहे त्यामुळे जनतेला अशी अपेक्षा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीबांसाठी किंवा हातावर पोट असलेल्यांसाठी काहीतरी पॅकेजची घोषणा करतील. मात्र आज त्यांनी जो देशवासीयांशी संवाद साधला त्यात या गरीबांचा उल्लेखही केला नाही. अनेक डॉक्टरांकडे आज सेफ्टी किट्स नाहीत. अनेक उपकरणांची, साधनांची कमतरता आहे. अशात दिवे लावण्याचे सल्ले देऊन ते काय साधत आहेत? ” असाही प्रश्न थरुर यांनी विचारला आहे.