संगीतकार इलियाराजा यांच्यासह ४०हून अधिक जणांना मंगळवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात संगीतकार इलायराजा, शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान आणि विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पी. परमेश्‍वरन यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.

राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. यंदा देशभरातील ८५ जणांना विविध पद्म पुरस्कार जाहीर झाले. (यामध्ये विभागून दिलेल्या दोन पुरस्कारांचा समावेश) पद्म पुरस्कारांमध्ये ३ जणांना पद्मविभूषण, ९ जणांना पद्मभूषण आणि ७३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये १४ महिलांचा तर १६ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. ३ जणांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापैकी ४३ मान्यवरांना आज पुरस्कार वितरित करण्यात आले.

यंदा या पुरस्कारातील पद्मश्री हा किताब राज्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे राणी बंग आणि अभय बंग, संपत रामटेके, अरविंद गुप्ता तसेच मुरलीकांत पेटकर यांना जाहीर झाला आहे. त्याचबरोबर पंकज आडवाणी यांना बिलियर्ड खेळातील योगदानासाठी पद्मभूषण जाहीर झाला आहे. तसेच फिलिपोज मार क्रिजोस्टोम यांना आधात्मिक क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण जाहीर झाला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यालाही पद्मभूषणने गौरविण्यात आले.