गुजरातच्या छोटा उदयपूर जिल्ह्यातील डोलारीया गावाच्या वेशीवरील खड्ड्यात मंगळवारी सकाळी शिरच्छेद झालेला एक मृतदेह सापडला. रेसिंह धानूक असे मृत व्यक्तिचे नाव असून ६ एप्रिल रोजी त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तेरीया राठवा नावाच्या व्यक्तिला अटक केली आहे. मंगळवारी सकाळी नारान राठवा प्रांतविधीसाठी गेलेले असताना त्यांना धानूकचा शीर नसलेला मृतदेह आढळला. त्यांनी लगेच गावच्या सरपंचांना आणि अन्य गावकऱ्यांना माहिती दिली.

धड सापडल्यानंतर काही तासांनी मृतदेहापासून काही अंतरावर शीर सापडले. त्यानंतर मृतदेह गावात राहणाऱ्या रीसिंह धानूकचा असल्याची ओळख पटली. धानूकची आई खुमलीने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये त्याच गावात राहणाऱ्या तेरीया राठवावर मुलाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. धानूक तेरीया राठवाच्या शेतामध्ये मजूर म्हणून काम करायचा. त्यावेळी त्याचे तेरीयाच्या पत्नीबरोबर सूत जुळले.

प्रेमाच्या लाटेवर स्वार झालेले दोघेही मागच्यावर्षी दिवाळीमध्ये गावातून पळून गेले होते. महिन्याभराने दोघेही पुन्हा गावी परतले. त्यानंतर धानूक कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थायिक झाला. त्या दरम्यान तेरीया सतत घरी येऊन धानूकबद्दल चौकशी करायचा.त्याने धानूकला जीवे मारण्याची धमकी दिली होती असे खुमलीने सांगितले.

धानूक मागच्याच आठवडयात घरी आला होता. ६ एप्रिलच्या रात्री जेवण झाल्यानंतर फोनवर कॉल आला म्हणून तो घराबाहेर पडला. बराचवेळ होऊनही घरी परतला नाही तेव्हा आईने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तेरीयाला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. धानूकचे आपल्या पत्नीबरोबर प्रेमसंबंध होते त्याचा रागातून मी आणि पालव राठवाने मिळून त्याची हत्या केल्याची कबुली तेरीयाने दिली.