शीत युद्धाच्या काळात क्युबामध्ये क्षेपणास्त्रे तैनात केल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती. अमेरिकेला पुन्हा तशीच वेळ आणायची असेल तर रशिया लष्करी दृष्टया त्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेला दिला आहे. शीत युद्धाच्या काळात अमेरिकेने टर्कीमध्ये रशियाच्या दिशेने क्षेपणास्त्रे तैनात केल्यानंतर रशियाने १९६२ साली क्युबामध्ये अमेरिकेच्या दिशेने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तैनात करुन उत्तर दिले होते.

त्या संघर्षाच्या काळात दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र युद्धापर्यंत परिस्थिती चिघळू शकते असा अंदाज अनेक तज्ञांनी वर्तवला होता. आता पाच दशकानंतर अमेरिका युरोपमध्ये अण्वस्त्र वाहून नेणारी क्षेपणास्त्रे तैनात करेल अशी भिती रशियाला वाटत आहे. त्यातूनच व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेला हा इशारा दिला आहे.

अमेरिकेने रशियाच्याजवळ क्षेपणास्त्रे तैनात केली तर रशिया सुद्धा अमेरिकेच्या जवळ क्षेपणास्त्राची तैनाती करेल असे पुतिन यांनी म्हटले आहे. शीत युद्धाच्या काळात जग दोन गटांमध्ये विभागलेले होते. अमेरिकेच्या समुद्राजवळ तैनात असलेली रशियाची युद्धजहाजे आणि पाणबुडयावर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे तैनात करु असा इशारा पुतिन यांनी दिला आहे.

पुतिन यांचे इशारे प्रचाराचा भाग असल्याचे सांगत अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने त्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. रशिया आयएनएफ कराराचे उल्लंघन करत आहे. त्या आरोपांवरुन लक्ष हटवण्यासाठी पुतिन असे आरोप करत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिकेची क्षेपणास्त्रे रशियात पोहोचण्याधीच रशियन क्षेपणास्त्रे अमेरिकेमध्ये धडकलेली असतील असे व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. आम्हाला अमेरिकेबरोबर शस्त्रास्त्र स्पर्धा करण्याची इच्छा नाही. पण युरोपमध्ये मिसाइलस तैनात झाली तर आमच्यासमोर दुसरा पर्याय नसेल असे पुतिन यांनी सांगितले. .