बंदी घालण्यात आलेल्या हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीन हा आजही भारतात परतण्यास इच्छुक आहे, परंतु त्याच्या परतीची योजना आखण्याबाबत युपीए सरकारने बराच वेळ वाया घालवला, अशी खंत रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ) चे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी व्यक्त केली आहे.
२००१ सालापर्यंत सलाहउद्दीन हा भारतात परतण्यास तयार झाला होता आणि मी त्याच्यासाठी शंभरवेळा शिफारस केली. मात्र माझ्यानंतर आलेले ‘रॉ’ चे प्रमुख विक्रम सूद यांचे इतर काही हितसंबंध असावेत. सामान्यत: मी पंतप्रधान कार्यालयातून काश्मीरविषयक मुद्दे हाताळत असल्यामुळे आपल्याला त्यात लक्ष देण्याची गरज नाही असे त्यांच्या लोकांनी त्यांना सांगितले असावे, असे ‘काश्मीर : दि वाजपेयी इयर्स’ या पुस्तकात दुलत यांनी म्हटले आहे.
सलाहउद्दीन याने केंद्रीय गुप्तचर विभागाचे श्रीनगर येथील तत्कालीन प्रमुख के.एम. सिंग यांना दूरध्वनी करून, त्याच्या मुलाला एका वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत मागितली होती. हे काम झाल्यानंतर त्याने सिंग यांचे आभारही मानले होते. याचे भांडवल करता आले असते, परंतु दुर्दैवाने आपण ते कधीच केले नाही. आम्ही सलाहउद्दीन याला परत आणू शकलो असतो, त्याचीही तशी इच्छा होती, फक्त त्याला केव्हा आणायचे एवढाच प्रश्न होता. मात्र सरकारने यासाठी बराच घोळ घातला, असा उल्लेख दुलत यांनी केला आहे.
मी ‘रॉ’ सोडल्यानंतर संघटनेने काश्मीर तेवढा रस दाखवला नाही, असे काश्मीर मुद्यावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विशेष सल्लागार राहिलेले दुलत यांनी लिहिले आहे.