जवळपास २३ हजारांहून जास्त लोकांची फसवणूक करुन भारतातून पळ काढणारा मुख्य आरोपी मोहम्मद मन्सूर खान याने भारत सोडणं आपली मोठी चूक होती आणि आपण २४ तासांत भारतात परतणार आहोत असा दावा केला आहे. आय मॉनेटरी अ‍ॅडव्हायजरी’ (आयएमए) समूहाचा संस्थापक असणारा इस्लामिक बँकर मन्सूर खान याने ८ जूनच्या रात्री भारतातून पळ काढला होता. त्याने लोकांना कोट्यवधीचा गंडा घातला होता.

मन्सून खान याचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यात तो सांगत आहे की, “पुढील २४ तासांत मी भारतात परतणार आहे. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे. भारत सोडणं ही माझी सर्वात मोठी चूक होती. पण परिस्थिती अशी होती की मला भारत सोडणं भाग होतं. माझं कुटुंब कुठे आहे हेदेखील मला माहिती नाही”.

मन्सूर खान याने अनेकांना मोठे रिटर्न्स मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत गंडा घातला आहे. त्याने सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती. मन्सूर खान याने मुस्लिम समुदायातील लोकांना लक्ष्य करत तब्बल १ हजार ५०० कोटी रूपये जमवले होते. विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याने पळ ठोकला होता. बंगळुरू शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली होती. पण त्याआधीच त्याने भारत सोडून पळ काढला होता.

कोट्यवधींचा गंडा घालून ‘इस्लामिक बँकर’ फरार

मन्सूर खानची आपण आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हजारो गुंतवणूकदार तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले होते. यानंतर खऱ्या अर्थाने हा घोटाळा समोर आला होता. पोलिसांनी मन्सूर खान दुबईला पळून गेल्याची माहिती दिली होती. दरम्यान आयएमएच्या सातपैकी निजामुद्दीन अजीमुद्दीन या संचालकास पोलिसांनी आधीच अटक केलेली आहे.

मन्सूर विरोधात सध्या २३ हजार तक्रारी दाखल असून पहिली तक्रार त्याचा जवळचा मित्र आणि व्यवसायातील भागीदार खालिद अहमद याने दाखल केली होती. त्याने मन्सूरवर 4.8 कोटी रूपयांच्या फसवणुकीचा आरोप केला होता.