प्रतिष्ठित ब्रिटिश मेडिकल जर्नल ‘The Lancet’ने नरेंद्र मोदी सरकारच्या जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या आणि राज्याचं विभाजन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर सवाल उपस्थित केलेत. 17 ऑगस्ट रोजी, ‘काश्मीरच्या भविष्याबद्दल भीती आणि अनिश्चितता’ अशा मथळ्याखाली संपादकीय छापून The Lancet ने काश्मिरी नागरीकांबाबत विविध गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर, भारतीय वैद्यकीय संघटनेने (IMA) Lancet च्या संपादकांना पत्र लिहून संपादकीयचा निषेध नोंदवला आहे. भारताच्या अंतर्गत आणि तेही राजकीय मुद्यावर भाष्य करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही अशा तीव्र शब्दांत आयएमएने सुनावलं आहे.

Lancet चे संपादक रिचर्ड होर्टोन यांना IMA ने पत्र लिहून, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भाष्य करणं तुमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. अधिकारक्षेत्रात नसलेल्या मुद्द्याबाबत राजकीय टीप्पणी करुन तुम्ही तुमच्या मर्यादेचं उल्लंघन केलंय, आणि असंही काश्मीरच्या समस्येचा वारसा ब्रिटिश साम्राज्याकडूनच आम्हाला मिळाला आहे अशा शब्दांमध्ये सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.

शनिवारच्या संपादकीयमध्ये Lancet ने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला वादग्रस्त म्हटलं होतं. काश्मिरी नागरीकांचं स्वास्थ्य, सुरक्षा आणि त्यांच्या स्वातंत्र्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी भलेही काश्मीरसाठी शांतता आणि समृद्धीचं पाऊल म्हणत असले तरी आधी काश्मिरींना आपल्या दशकांपूर्वीच्या जखमांवर मलमपट्टी करण्याची आवश्यकता आहे, अशा आशयाचं हे संपादकीय होतं.

दरम्यान, भारतीय वैद्यकीय संघटनेने (IMA) Lancet च्या संपादकांना पत्र लिहून संपादकीयबाबत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे