करोनामुळे सामान्यांबरोबरच अनेक डॉक्टरांनाही आपला प्राण गमावावा लागला आहे. रुग्णसेवा करताना करोनाचा संसर्ग झाल्याने शेकडो डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. करोनाविरुद्ध लढणाऱ्या पहिल्या फळीतील या आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना करोनायोद्धा म्हणावे असं सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र या आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना शहीद म्हटले जात नाही. आता यावरुनच देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारच्या दुहेरी भूमिकेवरुन आयएमएने हा ढोंगीपणा असल्याचा टोला लगावला आहे. आयएमएकडे करोनामुळे मृत्यू झालेल्या ३८२ डॉक्टरांची यादी असून ही यादीही केंद्र सरकारला पाठवण्यात आली असून या डॉक्टरांना शहीद दर्जा द्यावा अशी मागणी एका पत्राच्या माध्यमातून करण्यात आल्याचे, ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

एकीकडे सरकार आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना करोनायोद्धे म्हणते आणि दुसरीकडे करोनामुळे रुग्णसेवा करणाऱ्या किती जणांचा प्राण गेला हेही सरकारला ठाऊक नाही, असं म्हणत आयएमएने सरकारी धोरणांबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी संसदेमध्ये सरकारने आपल्याकडे करोनायोद्ध्यांच्या मृत्यूसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. करोनाशी लढा देताना किती डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले यासंदर्भातील आकडेवारी सरकारने जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र आपल्याकडे करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांच्या मृत्यूची आकडेवारी नसल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा- थाळी वाजवणं, दिवे लावणं यापेक्षा ‘त्यांची’ सुरक्षा महत्त्वाची; राहुल गांधींची सरकारवर टीका

करोनामुळे ३८२ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे आयएमएने स्पष्ट केलं आहे. ३८२ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची आमच्याकडे आकडेवारी असताना संसदेमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालय हा राज्य सरकारचा विषय असल्याचे सांगत कोणतीच आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगत आहे हे आश्चर्यकारक असल्याचे आयएमएने म्हटलं आहे. हा प्रकारमध्ये युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांची आकडेवारी ठाऊक नसण्यासारखाच आहे, असं मत काही वरिष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी, “दुखद अंतकरणाने आम्ही ही चिठ्ठी लिहिली आहे. देशसेवा करण्यासाठी झटत असलेले माझे सहकारी असणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांची ही विडंबना आहे. जर आम्ही राज्यांंतर्गत येणारा विषय असू तर यापेक्षा आमची अधिक विडंबना काय असू शकते,” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- Coronavirus: भारतातील रुग्णसंख्येने ओलांडला ५२ लाखांचा टप्पा

आरोग्य मंत्रालयाने संसदेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्यासंदर्भातील माहिती एकत्र करण्यात आलेली नाही. मात्र मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या विम्यासंदर्भातील दाव्यांची आकडेवारी आपल्याकडे असल्याचे नसल्याचे स्पष्ट केलं होतं.