बालाकोट हल्ल्याबाबत उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचा हवाला

नवी दिल्ली : पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-महम्मद चालवत असलेल्या मदरशांच्या सहा इमारती अद्यापही तेथे सुस्थितीत असल्याचे उच्च क्षमतेच्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रामध्ये दिसून आल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

सॅनफ्रान्सिस्को येथील ‘प्लॅनेट लॅब्ज’ या खासगी उपग्रह चालवणाऱ्या संस्थेने घेतलेली छायाचित्रे ४ मार्चला प्रसारित केली असून त्यात बालाकोट येथे अद्यापही सहा इमारती असल्याचे आढळले आहे. भारतीय वायुदलाने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील जाभामधील जैश-ए-महम्मदच्या तळावर हल्ले करून ते उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.

प्लॅनेट लॅब्जने घेतलेल्या छायाचित्रामध्ये सर्वच गोष्टी ठळकपणे दिसत असून बॉम्बमुळे होणारे नुकसान, इमारतींच्या छतांना भगदाड पडल्याचे, भिंती पडल्याचे किंवा काही जळाल्याच्या खुणा आढळून आल्या नाहीत, असेही वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे मौन

या छायाचित्रांसंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाशी ई-मेलद्वारे संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही, असेही वृत्तसंस्थेने सांगितले. या वृत्तसंस्थेने प्रसारित केलेल्या या वृत्तामध्ये पाकिस्तानातील रुग्णालये, स्थानिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांचा हवाला देऊन तेथे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही म्हटले आहे.