नवी दिल्ली : अगदी नजीकच्या कालावधीसाठीचा हवामान अंदाज देण्यासाठी भारतीय हवामान विभाग कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करणार आहे, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.

ते  म्हणाले,की तीन ते सहा तासातील अतिटोकाच्या हवामान घटनांचे अंदाज अधिक अचूक असावेत यासाठी हे तंत्र वापरण्यात येणार आहेत. हवामान अंदाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर फार मोठय़ा प्रमाणात करण्यात आलेला नाही. तो आता करण्यात येत असून त्यात यांत्रिक बुद्धिमत्तेला महत्त्व आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हवामान अंदाज अधिक अचूक करण्यासाठी काही संशोधन गटांना अभ्यासासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आतापर्यंत इतर क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर  बराच झाला असला तरी हवामान क्षेत्रात तो कमी आहे. पृथ्वी विज्ञान विभाग त्याबाबतच्या प्रस्तावांची पडताळणी करीत आहे. इतर संस्थांसमवेत भारतीय हवामान विभाग भागीदारीत संशोधन करीत आहे.

भारतीय हवामान विभाग आता ‘नाऊ कास्ट’ म्हणजे नजीकच्या काळातील हवामानाचा अंदाज सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने मागील हवामान प्रारूपांचा अभ्यास करता येतो व त्यातून निर्णय लवकर घेता येतात. अमेरिकेतील दी नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेने अलिकडेच मानवरहित प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, ओमिक्स, क्लाउड या तंत्रज्ञानांचा वापर हवामान अंदाजासाठी करण्याचे जाहीर केले होते.

पुढील तीन ते सहा तासांचा अंदाज

हवामान अंदाजासाठी उपग्रह छायाचित्र, रडार यांचा वापर केला जातो. ‘नाऊकास्ट’ या प्रकारात पुढील तीन ते सहा तासांचा हवामान अंदाज दिला जातो. वादळे, चक्रीवादळे , विजा कोसळणे, जोरदार पाऊस या घटनांचे अंदाज दिले जाऊ शकतात. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये गेल्या महिन्यात हवामान दुर्घटनांत १६० लोक ठार झाले होते.