उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाडयामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. देशभरात सर्वांनाच मान्सून कधी दाखल होणार याची प्रतिक्षा आहे. मान्सूच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस एक जून पर्यंत केरळात दाखल होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
दक्षिण पूर्व आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात ३१ मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मान्सून ठरलेल्या वेळेला एक जून पर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. एक जूनला केरळमध्ये मान्सून दाखल झाला नाही तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलतं.
अंदमानचा समुद्र, अंदमान-निकोबार बेट, बंगालचा उपसागराचा भाग आणि मालदीवच्या कोमोरीनपर्यंत मान्सून पोहोचला आहे. पुढच्या ४८ तासात मालदीवचे आणखी काही भाग नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. वादळाची शक्यता असल्यामुळे केरळमध्ये मच्छीमारांना रात्रीपर्यंत किनाऱ्यावर पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांना शक्य नाहीय, त्यांना जवळचा किनारा गाठण्यास सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने याआधी सहा जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असे म्हटले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 2:17 pm