केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी केलेल्या कंपनी करातील(कॉर्पोरेट टॅक्स) कपातीला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने(आयएमएफ) समर्थन दिले आहे. कॉर्पोरेट करामध्ये कपात करण्याचा निर्णय योग्य असून याचा भारतातील गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम जाणवेल, असं आयएमएफनं म्हटलं आहे. तसंच, भारताने वित्तीय परिस्थितीची दीर्घकालीन स्थिरता सुरक्षित करावी असंही आयएमएफने नमूद केलं आहे.

भारताने कंपनी करात कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो. या निर्णयाचा गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होईल, असे नाणेनिधीचे संचालक (आशिया पॅसिफिक विभाग) चांगयोंग री यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. भारताला अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मर्यादित वाव असल्याने त्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी, असेही चांगयोंग री म्हणाले. तर, भारतानं बिगर वित्तीय क्षेत्रातील मुद्द्यांवर उपाययोजना करायला हव्यात, असं मत आशिया आणि पॅसिफिक विभागाच्या उपसंचालक अॅन्ने-मॅरी गुल्डे वॉफ यांनी व्यक्त केलं. याशिवाय, देशातील सध्याच्या मंदीच्या स्थितीमुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ६.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. हा दर सन २०२०मध्ये वाढून सात टक्के होऊ शकतो असा अंदाज आयएमएफने वर्तवला आहे.

केंद्र सरकारने गुंतवणूक आणि उत्पादनवाढीसाठी काही दिवसांपूर्वी कंपनी करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत विकास दरात घट झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यानुसार, सवलत न घेणाऱ्या देशांतर्गत कंपन्यांना २२ टक्के आणि अधिभार आणि सेस मिळून एकूण २५.१७ टक्के कर द्यावा लागणार आहे. यापूर्वी कंपन्यांना ३० टक्के कर द्यावा लागत होता.