News Flash

पाकिस्तानकडून सरबजितच्या कुटुंबियांना तातडीने व्हिसा

पाकिस्तानातील कारागृहात हल्ला करण्यात आलेला भारतीय कैदी सरबजितसिंग याला भेटण्यासाठी त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांना पाकिस्तान उच्चायुक्तांच्या कार्यालयातून व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. कारागृहातील काही कैद्यांनी

| April 28, 2013 02:21 am

पाकिस्तानातील कारागृहात हल्ला करण्यात आलेला भारतीय कैदी सरबजितसिंग याला भेटण्यासाठी त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांना पाकिस्तान उच्चायुक्तांच्या कार्यालयातून व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. कारागृहातील काही कैद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सरबजितसिंग गंभीर जखमी झाला असून त्याला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे.
दिल्लीतील उच्चायुक्तांच्या कार्यालयातून व्हिसा मंजूर करण्यात आला असून सरबजितसिंग याच्या दोन कन्या पूनम आणि स्वप्नदीप कौर, पत्नी सुखप्रीत कौर आणि आपण स्वत: लाहोरला जाणार असल्याचे सरबजितसिंग याची बहीण दलबीर कौर यांनी सांगितले.
कोट लखपत तुरुंगात कैद असलेल्या सरबजितवर त्याच्याच बराकीतील सहा कैद्यांनी गुरुवारी हल्ला चढवला. त्याच्या डोक्यावर विटेचा फटका मारण्यात आला. त्यानंतर त्याच्या मानेवर व पोटात डब्याचे पत्रे खुपसण्यात आले. या हल्ल्यात सरबजित जबर जखमी झाला. त्याला येथील जिना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंतर्गत रक्तस्त्रावामुळे सरबजित कोमात गेला असून त्याला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. प्रकृती स्थिर झाल्याशिवाय सरबजितवर शस्त्रक्रिया करणे कठीण असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
सलमान खुर्शीद यांचा प्रस्ताव
परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी सरबजितवरील उपचारासाठी पाकिस्तानला वैद्यकीय मदत करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी ठेवला. या प्रकरणाच्या माध्यमातून सरबजितला पुन्हा भारतात परत आणण्याचे केंद्र सरकारच्या प्रयत्नांना अधिक बळकटी येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘त्या’ कैद्यांवर गुन्हा?
सरबजितवर हल्ला करणाऱ्या सहापैकी दोन कैद्यांची ओळख पटली असून आफ्ताब व मुदस्सर अशी त्यांची नावे आहेत. आफ्ताबचे सरबजितशी भांडण झाले होते. त्याचा राग मनात ठेवून त्याने हल्ला केल्याचे बोलले जाते. या दोन्ही कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांना क्लेश
सरबजितवरील हल्ला क्लेशदायक असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले. पाकिस्तानची लोकशाहीवर श्रद्धा नसल्याचेच या हल्ल्याने स्पष्ट होते, अशी टीका केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.
न्यायाधीशांची भेट
भारत आणि पाकिस्तानने परस्परांच्या देशांतील स्वदेशी कैद्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी नेमलेल्या समितीवरील भारताचे दोन निवृत्त न्यायाधीश न्या. के. एस. गिल व न्या. एम. ए. खान हे येत्या दोन दिवसांत लाहोर तुरुंगाला भेट देणार आहेत. शुक्रवारी या दोघांनी पाकिस्तानातील दोन निवृत्त न्यायाधीशांसह कराची तुरुंगाला भेट देऊन तेथील भारतीय कैद्यांची विचारपूस केली होती.
धोरणच कोमात..
भारताचे परराष्ट्र धोरण पाकिस्तानसमोर अपयशी आणि कुचकामी ठरल्याचेच सरबजितवरील हल्ल्याने सिद्ध होत आहे. सरबजितच नव्हे तर भारताचे परराष्ट्र धोरणच कोमात गेले आहे, अशी टीका भाजपने केली आहे. सरबजितवर हल्ला होऊ शकतो, अशी भीती त्याच्या नातेवाईकांनी याआधीच सरकारकडे व्यक्त केली होती. तरीही सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत हे अधिक क्लेशकारक आहे, असे पक्षप्रवक्ते सुधांशु त्रिवेदी म्हणाले.
राजनैतिक पातळीवर धावपळ
सरबजितवरील हल्ल्याची गंभीर दखल भारत आणि पाकिस्तानने घेतली. राजनैतिक पातळीवर शुक्रवारी दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांनी वेगाने हालचाली करत सरबजितच्या कुटुंबीयांना पाकिस्तानात जाण्यासाठी तातडीचा व्हिसा मिळवून दिला. सरबजितला मिळणाऱ्या वैद्यकीय उपचारांची पाहणी करण्यासाठी पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील दोन अधिकाऱ्यांना विशेष परवानगी देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2013 2:21 am

Web Title: immediate visa by pakistan to family of sarabjitsing
Next Stories
1 गोळीबाराचे ‘दिशादर्शक’ स्मार्टफोन!
2 सोनियांची परिवर्तनाची हाक
3 चिट फंड अडचणीत
Just Now!
X