पाकिस्तान कलाकारांसाठी भारतीय चित्रपट सृष्टीचे दरवाजे बंद झाले आहेत. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशनने (इम्पा)ने आपल्या ७७ व्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तान कलाकारांना काम न देण्याचा निर्णय घेतला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात रोष वाढला होता. राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांत भारत सोडून जाण्याचा आदेश दिला होता. त्यांनी ४८ तासांत देश सोडला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्यांना पळवून लावेल अशी धमकीही मनसेचे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी दिली होती.

मनसेच्या या भूमिकेनंतर टेलिव्हिजननेही पाकिस्तानी कलाकारांच्या मालिकांची ‘घरवापसी’चे संकेत मिळू लागले. भारतातील माध्यम क्षेत्रात आघाडीवर असलेला झी समुहाने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणण्याच्या विचार व्यक्त केला. झी समुहाचे प्रमुख खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी स्वत: ट्विटरवरून शनिवारी सकाळी ही माहिती दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत भारतविरोधात घेतलेली भूमिका दुर्दैवी असल्याचे मत सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केले होते. सुभाष चंद्रा यांच्या भुमिकेचे सोशल मीडियावर स्वागत केले गेले.

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने बुधवारी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. लष्कराच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत झाले. याच दरम्यान पाकिस्तानी कलाकारांना काम न देण्याचा निर्णय इम्पाच्या सर्वसाधारण बैठकीत एक मताने संमत झाला. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना आता भारताच्या चंदेरी दुनियेत स्थान मिळणार नसल्याचे पक्के झाले.