काहीवेळा आपण रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी लोखंडी गेटवर चढून उडी मारतो. पण अशी उडी मारताना छोटीशी चूक झाल्यास गंभीर शारीरीक इजा होऊ शकते. चेन्नई जवळच्या नुंगमबक्कम येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली. एक २९ वर्षांचा ड्रायव्हर रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी लोखंडी गेटवर चढला होता. पण उडी मारताना त्याचा अंदाज चुकला व गेटचा टोकदार भाग त्याच्या शरीरात घुसला.

जवळपास अर्धातास तो त्या गेटवर लटकलेल्या अवस्थेत पडून होता व मदतीसाठी याचना करत होता. अखेर रस्त्यावरच्या पादचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. रात्री एकच्या सुमारास पोलीस तिथे पोहोचले त्यांनी घटनास्थळी अॅम्ब्युलन्स बोलावली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कटरने तो गेट कापला व रुग्णाच्या शरीरात जो भाग घुसला होता तो तसाच ठेऊन त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले.

त्या रुग्णाचे सुदैव म्हणजे शरीरात घुसलेला गेटचा तो टोकदार भाग ह्दयापासून इंचभर अंतरावर होता असे डॉक्टर ए. शिवारमन यांनी सांगितले. शरीरात घुसलेला लोखंडी गज थेट काढला असता तर त्या रुग्णाचा जागीच मृत्यू झाला असता. सीटी स्कॅनमध्ये शरीरात घुसलेली लोखंडी सळई ह्दयाच्या जवळ असून डाव्या फुप्फुसाच्या काही भागाचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.

त्या रुग्णाचे सुदैव म्हणजे त्याच्या शरीरातील रक्तदाब आणि ह्दयाच्या ठोक्यांची गती व्यवस्थित होती. जवळपास दोन तास शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी अत्यंत सावधपणे शरीरात घुसलेली लोखंडी सळई बाहेर काढली व फुप्फुसावर शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांसाठी सुद्धा ही केस नवीन होती. याआधी चाकू पोटात खुपसल्याची अनेक प्रकरणे हाताळली होती असे डॉक्टर शिवरामन यांनी सांगितले. दरम्यान संबंधित रुग्ण डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून तो पुन्हा व्यवस्थित चालू शकतो.