सेनेटमधील मतदानात दोन तृतीयांश बहुमताची पूर्तता नाही

सत्तांतराच्या वेळी त्यांच्या समर्थकांना कॅपिटॉल हिल येथे हिंसाचारास उत्तेजन दिल्याबाबत दाखल करण्यात आलेल्या महाभियोगाच्या आरोपातून अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सेनेटमधील मतदानात मुक्तता झाली आहे. त्यांना दोषी ठरवण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज होती, पण तेवेढे बहुमत डेमोक्रॅटिक पक्षाला गोळा करता आले नाही.

माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे सात सदस्य फुटले होते, पण त्यामुळे बहुमताचे उद्दिष्ट साध्य झाले नसल्यामुळे ट्रम्प यांची मुक्तता झाली. सात सदस्यांनी या ऐतिहासिक महाभियोगात ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले. ट्रम्प यांच्यावरचा हा दुसरा महाभियोग होता. यापूर्वी यांनी युक्रेनच्या अध्यक्षांवर जो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांची चौकशी करण्यासाठी दबाव आणल्याच्या प्रकरणी ट्रम्प यांच्यावर पहिला महाभियोग दाखल करण्यात आला होता पण तोही यशस्वी झाला नव्हता. ट्रम्प यांच्यावर या वेळी ६ जानेवारीला यूएस कॅपिटॉल येथे दंगलीस उत्तेजन दिल्याचा आरोप होता.

या दंगलीत एका पोलिस अधिकाऱ्यासह पाच जण ठार झाले होते. ५७  विरुद्ध ४३ मतांनी ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग या वेळी फेटाळला गेला. सात रिपब्लिकनांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने मतदान केले होते. दोन तृतीयांश बहुमताला १० मते कमी पडली. एकूण ६७ मतांची गरज बहुमतासाठी होती पण तेवढी मते डेमोक्रॅट पक्षाला गोळा करता आली नाहीत.

सेनेटने फेब्रुवारी २०२० मध्ये पहिल्या महाभियोगातून ट्रम्प यांना मुक्त केले होते. जो बायडेन यांच्या मुलाची युक्रेनच्या अध्यक्षांनी चौकशी करावी यासाठी त्यांनी दबाव आणला होता.  ज्या सात रिपब्लिकनांनी डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान केले त्यात बिली कॅसिडी, रिचर्ड बर, मिट रॉमनी, सुसान कॉलिन्स, लिसा मुरकोवस्की, बेन बॅसी, पॅट टुमी यांचा समावेश आहे.

ट्रम्प यांनी महाभियोगातून सुटकेनंतर म्हटले आहे, की कुठल्याही अध्यक्षाला अशा परिस्थितीतून जावे लागले नसेल यात शंका नाही. एका राजकीय पक्षाने देशातील कायद्याच्या प्रक्रियेचेच प्रतिमा हनन केले असून कायद्याचीच बदनामी केली आहे. राजकीय सूडापोटी आपल्यावर हा महाभियोग दाखल करण्यात आला होता. आपली मते ज्यांना पटत नाहीत त्यांचा आपला  छळ करून काळ्या यादीत टाकण्याचा हेतू यात होता. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सूडाचा प्रवास होता, अशा शब्दात त्यांनी महाभियोगाची निर्भत्सना केली. आपण नेहमीच कायद्याच्या राज्याचे समर्थन केले असून अमेरिकी लोकांच्या हक्कांचे रक्षण केले आहे असे सांगून ज्या सदस्यांनी बाजूने मतदान केले त्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. न्याय व सत्यासाठी त्यांनी लढा दिला, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आपण आपला प्रवास सुरूच ठेवणार असून ‘मेकिंगअमेरिका ग्रेट अगेन’ ही ऐतिहासिक चळवळ पुढे नेणार आहोत. अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले,की प्रत्येक लोकशाहीत काही त्रुटी असतात त्यामुळे सत्याचे रक्षण करणे हे प्रत्येक अमेरिकी व्यक्तीचे कर्तव्य ठरते. लोकशाहीचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सतत सतर्क राहिले पाहिजे. सत्याचा विजय व असत्याचा पराभव ही प्रत्येक अमेरिकी व्यक्तीची जबाबदारी आहे.

 नॅन्सी पलोसी यांची टीका

सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पलोसी यांनी म्हटले आहे, की ट्रम्प यांना दोषी न ठरवणाऱ्या रिपब्लिकन सदस्यांनी राज्यघटनेचाच विश्वासघात केला आहे. केवळ स्वत:चे हित पाहून रिपब्लिकनांनी मतदान केले. त्यांनी त्यात लोकशाही संस्थेचा अपमान केला आहे. रिपब्लिकन नेते मिच मॅकोनेल यांनी सांगितले,की ट्रम्प हेच हिंसाचाराला  जबाबादार होते. त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले नाही. तरी आपण त्यांना दोषी ठरवण्याच्या विरोधात मतदान केले,  कारण ते आता अध्यक्ष नसल्याने त्यांना दोषी ठरवून फारसे काही होणार नव्हते. असे असले तरी ट्रम्प यांना अजूनही न्यायालयात उभे करून दोषी ठरवता येऊ शकते.

दोषी ठरले असते तर…  जर ट्रम्प यांना दोषी ठरवले गेले असते तर त्यांना पुन्हा निवडणूक लढवता आली नसती.

‘रिपब्लिकन पक्षाची चूक’

ट्रम्प यांना दोषी ठरवले गेले नसले तरी त्यांच्यावरील आरोप वादातीत होता. सेनेटचे नेते मॅकोेनेल यांनीही ट्रम्प दोषी असल्याचे मान्य केले होते. रिपब्लिकन पक्षाने केलेले मतदान हे इतिहासात दुर्दैवी ठरणार असून त्यांनी ट्रम्प यांना दोषी ठरवले नाही ही चूक केली, अशी प्रतिक्रिया डेमोक्रॅटिक पक्षाने व्यक्त केली आहे.