वॉशिंग्टन : अमेरिकी सिनेटने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग सुनावणीची प्रक्रिया गुरुवारी फारसा गाजावाजा न करता सुरू केली आहे.

निवडणूक वर्षांतच ट्रम्प यांना महाभियोगास  सामोरे जावे लागत असून या सुनावणीत सहभागी होणाऱ्या सिनेटर्सनी निष्पक्ष न्याय देण्याची शपथ घेतली. सभागृहाच्या अभियोक्तयांनी ट्रम्प यांच्यावरील आरोपांचे वाचन केले, या सुनावणीच्या अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस होते. अमेरिकी लोकशाहीच्या इतिहासात आतापर्यंत महाभियोगाची कारवाई अध्यक्षांवर होण्याची ही तिसरी वेळ आहे.

जे चार सिनेटर ट्रम्प यांची सुनावणी करणार आहेत ते यंदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी शर्यतीत आहेत. गुरुवारी दुपारी सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली. सर्वच सिनेटर्स सभागृहात उपस्थित होते. सहसा सगळे जण कधी उपस्थित नसतात पण महाभियोगाची सुनावणी असल्याने उपस्थिती पूर्ण होती. यावेळी मोबाइलवर बोलण्यास बंदी घालण्यात आली होती. या महाभियोगात अमेरिकेतील लोकशाहीच्या कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ या सगळ्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली. या  सुनावणीसाठी सरन्यायाधीश रॉबर्ट्स यांचे आगमन झाल्यानंतर सिनेटर्सनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.

सभागृहात आल्यानंतर त्यांनी सिनेटर्सना सांगितले की, ट्रम्प यांच्यावरील महाभियोग  कारवाईत सुनावणी करताना निष्पक्षपणे न्याय दिला जाईल याचे वचन देण्यात येत आहे, यासाठी सर्वानी हात वर करून मान्यता द्यावी, नंतर त्यांनी शपथ पुस्तिकेत स्वाक्षऱ्या केल्या. ट्रम्प यांच्यावर दोन आरोप आहेत.