केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफचे सरकार सत्तेवर आल्यास राज्यात किमान मिळकत हमी योजनेची (न्यूनतम आय योजना – न्याय) अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन मंगळवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिले.

पुथुपल्ली विधानसभा मतदारसंघातील मनरकाड येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत गांधी बोलत होते. केरळचे माजी मुख्यमंत्री ओम्मन चंडी हे गेल्या ५० वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

या योजनेनुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी थेट ७२ हजार रुपये जमा होणार आहेत, गरिबीवर अखेरचा हल्ला करणाऱ्या योजनेची ही सुरुवात आहे. या योजनेची कल्पना गांधी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडली होती. तथापि जाहीरनाम्यात या योजनेचा समावेश करण्यात आलेला असतानाही काँग्रेस लोकसभा निवडणुकीत पराभूत झाला होता.

केरळमध्ये या योजनेला यश मिळाले तर देशातील काँग्रेसशासित अन्य राज्यांमध्ये ही योजना राबविण्याचा आपला मानस आहे, असेही गांधी म्हणाले.

गरिबीशी दोन हात कसे करावयाचे हे देशाला केरळ दाखवून देईल, असेही ते म्हणाले.