भारताने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या वस्तूंवर सीमा शुल्क २०० टक्के वाढवल्यानंतर तेथून होणारी आयात ९२ टक्के कमी झाली आहे. पाकिस्तानातून होणारी आयात मार्च अखेरीस २.८४ दशलक्ष डॉलर्सची होती.

पुलवामा हल्ल्यानंतर (१४ फेब्रुवारी २०१८) यावर्षी १६ फेब्रुवारीला पाकिस्तानविरोधात भारताने आर्थिक कारवाई केली होती, त्यात पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंवर २०० टक्के सीमा शुल्क लादण्यात आले होते. कापूस, फळे, सिमेंट, पेट्रोलियम पदार्थ, खनिजे पाकिस्तानातून आयात करण्यात येत होती.

व्यापार मंत्रालयाच्या माहितीनुसार  मार्च २०१८ अखेरीस ३४.६१ दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंची आयात झाली. मार्चमध्ये २.८४ दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंची आयात करण्यात आली असून त्यात १.१९ दशलक्ष डॉलर्सच्या कापसाचा समावेश आहे. व्यापाऱ्यांना २०० टक्के सीमाशुल्कासह वस्तू घेणे शक्य नसल्याने ते कच्चा माल आयात करीत आहेत. त्यावर आयात शुल्क शून्य आहे. प्लास्टिक, धागे, भाज्यांचे मसाले, कपडय़ांसाठी लागणारे घटक, रसायने, लोकर या वस्तू आयात केल्या जात आहेत.  २०१८-२०१९ जानेवारी ते मार्च या काळात पाकिस्तानातून होणारी आयात ४७ टक्क्य़ांनी कमी होऊन ती ५३.६५ दशलक्ष डॉलर्स होती.

भारताची निर्यातही ३२ टक्के कमी

भारताची पाकिस्तानला निर्यातही ३२ टक्के कमी झाली असून ती मार्च अखेर १७१.३४ दशलक्ष डॉलर्स होती. २०१८-१९ दरम्यान २ अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात झाली, ही वाढ ७.४ टक्के आहे. भारत पाकिस्तानला कार्बनी रसायने, कापूस, अणुभट्टय़ा, बॉयलर, प्लास्टिक , तांबे, चपला निर्यात करतो. भारताने पाकिस्तानाचा व्यापारानुकूल देशाचा दर्जाही दहशतवादी हल्ल्यानंतर काढून घेतला होता.