देशात सध्या करोनाचा कहर वाढत आहे. अशावेळी मनुष्यबळाचीही कमतरता भासू लागली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मनुष्यबळ वाढवण्यासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

नीट(NEET-PG) ही परीक्षा ४ महिने पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवी तारीख परीक्षेच्या एक महिना अगोदर जाहीर केली जाईल.त्याचबरोबर इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांनाही आता करोनारुग्णांची सेवा बजावण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे इंटर्न्स त्यांच्या वरिष्ठांसोबत राहून करोना रुग्णांवर उपचार करतील. फोनच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देण्यासाठी तसंच सौम्य लक्षणं असलेल्या करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी या डॉक्टर्सची मदत घेतली जाणार आहे.

यामुळे आत्ता सेवा बजावत असलेल्या डॉक्टरांवरचा कामाचा ताण कमी व्हायला मदत होणार आहे. पदव्युत्तर शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थीही निवासी डॉक्टर्स म्हणून काम करु शकणार आहेत. त्याचबरोबर बीएससी किंवा जीएनएम हे शिक्षण घेतलेल्या नर्सना देखील करोना काळात वरिष्ठांच्या हाताखाली काम करण्यासाठी नेमण्यात येणार आहे.

ड्युटीचे कमीतकमी १०० दिवस पूर्ण केल्यानंतर करोना काळात काम केलेले हे वैद्यकीय कर्मचारी शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी पात्र ठरणार आहे. त्यांना शासकीय सेवेत प्राधान्य देण्यात येणार आहे.

करोना काळात काम केलेल्या या कर्मचाऱ्यांचं लसीकऱण करण्यात येईल तसंच भारत सरकारच्या आरोग्य सेवकांसाठीच्या इन्शुरन्स योजनेचाही लाभ घेता येईल. कमीत कमी १०० दिवस ड्युटी केल्यानंतर अशा सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भारत सरकारकडून सन्मानित कऱण्यात येणार आहे.