News Flash

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प?

आपण पुन्हा निवडून येऊ, असा ठाम विश्वास ट्रम्प यांना आहे.

सरणाऱ्या वर्षांला निरोप देताना घडलेल्या भल्या-बुऱ्या आठवणींना विसरून नव्या वर्षांत काही नवे घडेल, अशी अपेक्षा ठेवताना नवे संकल्प, नवीन आशा घेऊन नववर्षांचे स्वागत करणाऱ्या आपल्याला पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना नसते. ‘लोकसत्ता’ने २०२० वर्षांत निश्चितपणे घडणाऱ्या घटनांची तयार केलेली ही वेधदर्शिका..

|| अमेरिकेत पुन्हा ट्रम्प?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा निवडून येणार का, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी यंदा ३ नोव्हेंबरला मतदान होईल.  महाभियोग मंजूर होऊनही ट्रम्प यांच्यावर काहीही फरक पडलेला नाही.  महाभियोगानंतर त्यांच्या लोकप्रियतेत घट झाली असली तरी त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यावर किती परिणाम होऊ शकतो याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. ट्रम्प यांना आव्हान देण्याकरिता डेमॉक्रेटिक पक्षात अनेक जण इच्छुक आहेत. या स्पर्धेत ट्रम्प यांना ज्यांच्यामुळे महाभियोगाचा सामना करावा लागला ते माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडन, मायकल ब्लुमबर्ग, तुलसी गबार्ड आदी स्पर्धेत आहेत. रिपब्लिकन पक्षातही ट्र्म्प यांना आव्हान देण्याची तयारी काही जणांनी केली आहे. अर्थात ट्रम्प यांनी त्यांची खिल्लीही उडविली.

आपण पुन्हा निवडून येऊ, असा ठाम विश्वास ट्रम्प यांना आहे. महाभियोग मंजूर झालेले तिसरे राष्ट्राध्यक्ष, असा शिक्का ट्रम्प यांच्यावर बसला असला तरी आपण केले तेच बरोबर, असा त्यांचा ठाम दावा आहे. ट्रम्प यांची कारकीर्द अनेक अर्थाने वादग्रस्त ठरली असली तरी अमेरिकेतील रोजगाराच्या संधी वाढल्या ही ट्रम्प यांच्यासाठी जमेची बाजू मानली जाते.

अन्य काही निवडणुका

’इस्रायल संसद – मार्च (कोणत्याच पक्षाला निर्णायक बहुमत मिळाले नसल्याने एका वर्षांत तिसऱ्यांदा निवडणूक)  ’श्रीलंका संसद – नोव्हेंबर

निवडणुकींचे वर्ष

दिल्ली विधानसभा : नव्या वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजप या दोघांची कसोटी लागणार आहे. पाच वर्षांत गरीब, झोपडपट्टीवासीय तसेच सामान्य लोकांसाठी केलेल्या कामांच्या आधारे निवडणूक जिंकण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न आहे. तर कोणत्याही परिस्थितीत दिल्ली जिंकायचीच हा निर्धार भाजपचा आहे.

बिहार विधानसभा : भाजप, लालूप्रसाद यादव पुन्हा भाजप यांच्या कुबडय़ांच्या आधारे सत्तेची कमान सांभाळणारे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची कसोटी लागली आहे. २०१५ मध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी करून सत्तेत आले होते. लालूंना शिक्षा होताच त्यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली. तुरुंगात असलेले लालूप्रसाद, त्यांच्या दोन मुलांमधील बेबनाव हे सारे नितीशकुमार यांच्या पथ्यावरच पडेल अशी चिन्हे आहेत. राज्यसभेच्या ६९ जागा रिक्त होणार : २०२० मध्ये राज्यसभेचे ६९ सदस्य निवृत्त होत आहेत. यात महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश असेल. महाविकास आघाडीच्या नव्या रचनेनुसार शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे चार तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात.

१०वी, १२वी परीक्षा रचनेत बदल

पूर्वप्राथमिकपासून पीएचडीपर्यंतच्या देशातील शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा शासनाकडे सुपूर्द होणे ही २०१९च्या शैक्षणिक जमा-खर्चातील महत्त्वाची घडामोड.सुब्रमण्यम समितीच्या शिफारशींवर पुनर्विचार करून मसुदा तयार करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली २०१७ मध्ये समिती नेमण्यात आली. या समितीचा मसुदा शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. शैक्षणिक स्तर रचना बदलणे, विद्यापीठांची रचना बदलणे, शिक्षण हक्क कायद्यातील बदल असे बदल या आराखडय़ात सुचवले आहेत.

पंचवीसावा बॉण्ड

इयन फ्लेमिंग यांच्या लेखणीतून सात दशकांपूर्वी साकारलेला जेम्स बॉण्ड हा हेर चित्रपटांत खास शैलीत समोर आला. ललनांच्या गोतावळ्यात रमणारा हा चलाख नायक खलनायकांना नामोरहम करताना पाहण्यात प्रेक्षकांना आनंद मिळू लागला. खास धूनसह पडद्यावर साकारणारी ही व्यक्तिरेखा आत्तापर्यंत वेगवेगळ्या अभिनेत्यांनी लोकप्रिय केली. ‘नो टाइम टू डाय’ हा २५वा बॉण्डपट येत्या वर्षांत दाखल होणार असून गेल्या काही चित्रपटांमधून रुळलेला बॉण्ड डॅनियल क्रेग त्यानंतर निवृत्त होणार असल्याचे जाहीर झाले आहे. रॅमी मालेक हा अभिनेता या बॉण्डपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

‘४जी’तून ‘५जी’कडे..

इंटरनेटला केवळ स्मार्टफोन किंवा संगणकापुरते मर्यादित न ठेवता ‘स्मार्ट होम’, ‘स्मार्ट शहरे’ आणि वस्तुजाल (इंटरनेट ऑफ थिंग्ज – आयओटी) अशा व्यापक पातळीवर उपयुक्त बनवणारे ‘५जी’ तंत्रज्ञान नव्या वर्षांत प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. दक्षिण कोरिया आणि काही प्रमाणात अमेरिकेत रुजत असलेले हे तंत्रज्ञान २०२० मध्ये भारतातही येण्याची चिन्हे आहेत. एअरटेल, रिलायन्स जिओ या कंपन्यांनी आपल्या पातळीवर ‘५जी’च्या चाचण्या केल्या असून नोकिया, सॅमसंग, एरिक्सन, ह्युआई या कंपन्याही आपल्या स्मार्टफोनना ‘५जी’ सज्ज करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या वर्षांच्या मध्यात भारत सरकार ‘५जी’च्या कंपनलहरींच्या (स्पेक्ट्रम) लिलावाची प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यापूर्वी कंपन्यांना चाचणीसाठी ‘स्पेक्ट्रम’ देण्याची तयारीही सरकारने चालवली आहे. अजूनही भारतातील अनेक स्मार्टफोनवर ‘५जी’ सक्रिय करणे शक्य नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान देशव्यापी होण्यासाठी पाच ते सहा वर्षे लागतील.

मेट्रोचा प्रगतिपथ..

मुंबई : मुंबईतील मेट्रोच्या दोन मार्गिका, दोन उड्डाणपूल आणि तीन उन्नत मार्ग होणार असल्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होणार आहे. पश्चिम उपनगरातील सततची वाहतूक कोंडी असणाऱ्या पश्चिम द्रुतगती मार्ग आणि लिंकिंग रोडवरील दोन मेट्रो मार्गिका वर्षअखेपर्यंत कार्यान्वित होतील. दहिसर ते डी. एन. नगर (मेट्रो २ ए) आणि दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) या दोन मार्गिका पूर्ण होतील. तसेच वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे वरळी सी लिंक या दरम्यान दोन उड्डाणपुलांचे काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर धारवी ते वांद्रे-वरळी सी लिंक दरम्यानची वाहतूक सुरळीत होण्यासाठी ३०० मीटर लांबीचा मार्ग पूर्ण होईल. मुंबई-नाशिक मार्गावरील मानकोली आणि राजनोली पुलाच्या डाव्या बाजूकडील मार्गिकेचे काम पूर्ण होईल.

पुणे आणि पिंपरीच्या मेट्रो मार्गाबरोबरच शिवाजीनगर ते हिंजवडी हा २३.३ किलोमीटर लांबीचा तिसरा मार्गही पुण्यासाठी प्रस्तावित आहे. या मार्गावर २३ स्थानके असतील. मात्र भूसंपादन झालेले नसल्याने या मार्गाचे काम मागे पडले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी हा प्रकल्प आता ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आला असून त्यामुळे या प्रकल्पासाठीचे भूसंपादन जिल्हाधिकाऱ्यांकडून केले जाणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) या मेट्रोचे काम केले जाईल. त्यामुळे या तिसऱ्या मेट्रो मार्गाचे कामही येत्या वर्षांत मार्गी लागेल.

वाहतूक वेगवान

पश्चिम रेल्वेपाठोपाठ नव्या वर्षांत मध्य रेल्वेच्या ठाणे ते पनवेल, वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावरही पहिली वातानुकूलित लोकल धावेल. त्याच्या अप-डाउन मार्गावर १६ फेऱ्या होतील. एकूण सहा वातानुकूलित लोकलचे मध्य रेल्वेवर येणार असून यातील सीएसएमटी ते कल्याण मार्गावरही तीन वातानुकूलित लोकल धावतील. त्याच्या २७ फेऱ्या होतील. सीएसएमटी ते पनवेल मार्गावरही एक लोकल धावेल तर उर्वरित एक लोकल ताफ्यात अतिरिक्त ठेवण्यात येईल.

  • १मुंबई ते पुणे दरम्यान डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला नवा साज देण्यात येईल. डेक्कन क्वीनला एलएचबी प्रकारातील डबे जोडले जाणार असून त्यामुळे अंतर्गत सजावट बदलेल. या एक्स्प्रेसमधे खानपान सेवेसाठी असलेल्या डायनिंग कारचेही रूपडे पालटणार आहे.
  • २एसटी महामंडळात विजेवर धावणारी वातानुकूलित बस सेवेत दाखल होईल. ही बस शिवाई नावाने ओळखली जाईल.
  • ३पश्चिम रेल्वेवरही अर्ध वातानुकूलित लोकलच्या प्रयोगाला वेग देण्यात येत असून तीदेखील याच वर्षांत चालवण्याचे उद्दिष्ट आहे.
  • ४ पावसाळ्यात मोठय़ा नुकसानीमुळे बंद झालेली नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनही सुरू केली जाणार आहे.

‘भारत स्टॅण्डर्ड ६’ची सुरुवात

वाहनांमुळे होणाऱ्या हवाप्रदूषणामुळे नियंत्रण ठेवण्यासाठी आखण्यात आलेल्या भारत स्टेज उत्सर्जन मानकांचा (बीएस) सहावा टप्पा येत्या १ एप्रिल २०२० पासून अमलात येणार आहे. सध्या ‘बीएस चार’वर आधारित इंजिनांवर चालणाऱ्या चारचाकी गाडय़ांच्या तुलनेत ‘बीएस-६’वर आधारित इंजिनातून निर्माण होणारे हवाप्रदूषण किमान ७० टक्के कमी असणार आहे. असे असले तरी, वाहननिर्मात्या कंपन्यांसाठी हे मोठे आव्हान आहे. त्यांना गाडय़ांचे इंजिनच नव्हे तर, त्याच्याशी निगडित अन्य गोष्टींमध्येही बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे चारचाकी वाहनांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘बीएस चार’वर आधारित इंजिन असलेल्या गाडय़ांच्या विक्रीवर १ एप्रिलपासून बंदी येणार आहे.

नवी सायबर पोलीस ठाणी

मुंबईत सर्वाधिक सायबर गुन्हे नोंद होतात. एकच पोलीस ठाणे असल्याने छोटय़ा, मोठय़ा तक्रारी येथेच नोंद होतात. अपुरे मनुष्यबळ, देशभर व्याप्ती असलेला क्लिष्ट तांत्रिक तपास, यामुळे गुन्ह्य़ांची उकल रेंगाळते. त्यामुळे मुंबईत आणखी चार सायबर पोलीस ठाणी निर्माण केली जाणार आहेत. त्यामुळे नवे तंत्रज्ञान आणि सुरक्षेबाबतची पोकळी याचा अभ्यास करून प्रभावी जनजागृती करणे, माहितीची देवाणघेवाण, समन्वय आदी शक्य होऊ   शकेल.

डॉ. आंबेडकर स्मारक यंदा पूर्ण

प्रदीर्घ काळचा संघर्ष आणि राजकीय उलथापालथीनंतर दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारण्याचे काम अखेर सुरू झाले. आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने- ‘डिसेंबर २०२० पर्यंत हे स्मारक पूर्ण केले जाईल,’ असे जाहीर केले होते. आता नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारनेही आंबेडकर स्मारकाच्या कामाला गती देण्याचे ठरविले आहे.

चैत्यभूमीवर आंबेडकरांचे मोठे स्मारक उभारले जावे, अशी १९८६ पासून मागणी होती. २००३ मध्ये त्या मागणीला जोर आला. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात आंबेडकर स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते.   २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले. दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार आले. त्या सरकारने आंबेडकर स्मारक हा विषय प्राधान्यक्रमावर घेतला. इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया केंद्रातील भाजप सरकारने तातडीने पार पाडली. त्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन ११ ऑक्टोबर २०१५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. मात्र प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) स्मारकाचे काम करीत आहे.  त्यासाठी ७०९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नव्या वर्षांत बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक पाहण्याची जनतेला प्रतीक्षा आहे.

नासाची मंगळ मोहीम मंगळावर अमेरिकेने

नासाच्या माध्यमातून यापूर्वी क्युरिऑसिटी आणि स्पिरिट या दोन बग्गीसारख्या रोव्हर गाडय़ा सोडल्या होत्या त्यात तेथील पाणी शोधण्यात यश आले, पण ते पाणी कुठून आले हा प्रश्न अनुत्तरित, त्याचे उत्तर शोधण्यासाठी जुलै किंवा ऑगस्टमध्ये नासा मार्स रोव्हर २०२० ही नवी गाडी सोडणार आहे.

  • रोव्हर मंगळावर १८ फेब्रुवारी २०२१ रोजी जेझेरो विवरात उतरणार
  • भूतकाळातील सूक्ष्मजीवांचा शोध, हवामान, भूगर्भ रचना यांचा अभ्यास, मंगळावरचे नमुने पृथ्वीवर आणणार
  • मार्स २०२० गाडी १०२५ किलो वजनाची आहे. त्यावर ६० कॅमेरे, रसायन विश्लेषण यंत्रे आहेत. छोटय़ा अणुभट्टीचा इंधनासाठी वापर
  • मोहिमेचा कालावधी मंगळावरचे एक वर्ष पृथ्वीवरचे ६८७ दिवस
  • एकूण खर्च २.४६ अब्ज डॉलर

ग्राहक खरा राजा..

२०२० या वर्षांत नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू होणार आहे. यानुसार ग्राहक न्यायालयांची आर्थिक कार्यकक्षा वाढणार आहे. अनुचित व्यापारी प्रथा (फसव्या जाहिराती, अधिकचे शुल्क) याअंतर्गत येणाऱ्या तक्रारींसाठी नवे प्राधिकरण स्थापन केले जाईल. फसव्या जाहिरातींसाठी जाहिरातदारासह सेलिब्रिटीवरसुद्धा कारवाई केली जाईल. ई-कॉमर्समध्ये विक्रेता आणि उत्पादकांची जबाबदारी निश्चित केली जाईल.

आरोग्य सुविधा आणि प्रभावी धोरणे..

क्षयरोगावरील दोन लसींचे संशोधन झाले असून ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ संस्थेच्या वतीने देशभरात याच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी केली जात आहे. यात मुंबईतील शिवडी क्षयरोग रुग्णालयाचाही समावेश आहे. या चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्यास फोफावणाऱ्या क्षयरोगाला आटोक्यात आणण्यास प्रभावशाली लस महत्त्वाच्या ठरतील. क्षयरोगाचे देशपातळीवरील सर्वेक्षण सुरू झाले असून यातून रुग्णांची नेमकी संख्या पटलावर येईल. असे सर्वेक्षण प्रथमच केले जात आहे. यामुळे क्षयरोग नियंत्रण आणि निमूर्लनासाठीच्या ठोस उपायोजना करण्यास मदत होईल.

पंतप्रधानांच्या महत्त्वांकाक्षी अशा ‘आरोग्यवर्धिनी’ केंद्राच्या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील १ हजार १२१ उपकेंद्रांचा विस्तार झाला आहे. यातील १ हजार १२१ उपकेंद्रांवर सामुदायिक वैद्यकीय अधिकारीही रुजू झाले असून प्राथमिक आरोग्य सेवा पूर्णवेळ उपलब्ध झालेली आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून साडेतीन हजार नर्सिग, युनानीचे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. राज्यातील दहा हजार केंद्रांचा विस्तार याअंतर्गत होणार आहे. येत्या वर्षांत ‘सरोगसी नियमन विधेयक’ राज्यसभेत पारित होईल आणि लवकरच याच्या अंमलबजावणीची शक्यता आहे. या नव्या विधेयकानुसार देशातील व्यावसायिक सरोगसीवर बंदी येऊन या प्रक्रियेवर निर्बंध येतील.

राज्य ६० वर्षांचे..

महाराष्ट्राच्या निर्मितीला या वर्षांत ६० वर्षे पूर्ण होणार आहेत. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना पंडित नेहरूंनी केली. मुंबईच्या शिवतीर्थावर मुंबई राजधानी असलेल्या महाराष्ट्राचा नकाशा विद्युत दीपांनी पंडित नेहरूंच्या हस्ते उजळविला गेला. मराठी माणसाचे राज्य अधिकृतपणे स्थापन झाले. देशाच्या नकाशावर महाराष्ट्र झळकला.

उद्यानांची मुंबई

मुंबई :   सिमेंट काँक्रीटच्या जंगलाच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईत पुढील वर्षभरात ६८ ठिकाणी वृक्षसंपदेने बहरलेली ‘मियावाकी’ उद्याने उभारण्याचा संकल्प मुंबई महापालिकेने सोडला असून प्राणवायू देणारी ही नवी फुप्फुसे मुंबईकरांसाठी वरदान ठरू शकतील असा आशावाद पालिकेकडून व्यक्त होत आहे. मुंबईच्या एका टोकाला असलेल्या दहिसरमध्ये तब्बल आठ ‘मियावाकी’ उद्याने उभी राहणार आहेत.  शहर, उपनगरात ३७, तर पूर्व उपनगरात २७ ठिकाणी ही उद्याने बहरणार आहेत.  मुंबई शहर आणि उपनगरातील वापरात नसलेल्या सुमारे ३१ एकर जागेवर ३ लाख ७७ हजार ४१६ झाडांची लागवड करून ही उद्याने उभी राहणार आहेत.  दहिसरमध्ये सर्वाधिक म्हणजे आठ ठिकाणी ही उद्याने उभी राहतील. मालाडमध्ये सात ठिकाणी, कांदिवलीमध्ये सहा ठिकाणी अशी उद्याने बहरणार आहेत. विशेष म्हणजे प्रदूषणाचा विळखा असलेल्या चेंबूर आणि माहुल परिसरात सहा ‘मियावाकी’ उद्याने साकारण्यात येणार आहेत.

कोणती झाडे? आंबा, हिरडा, बेहडा, वड, चिंच, जांभूळ, नांद्रुक, पिंपळ, बिजा, कडुनिंब, अंजन, शेवगा, शिरीष, सिसम, अर्जुन, कवठ, पळस, बिब्बा, बेल, आवळा, रिठा, उंबर, काटेसावर, बकुळ, गुंज, अगस्ती, कदंब, पुत्रजिवा, करंज, भेंड, सोनचाफा, बहावा, खैर, भोकर, तामण, सप्तपर्णी, स्मिता अशोक, कढिपत्ता, सिताफळ, डाळिंब, पारिजातक, लिंबू, बोर, शमी.

एकूण जागा – ३१ एकर

लागवडीसाठी वृक्ष संख्या – ३ लाख ७७ हजार ४१६

प्रतिवृक्ष खर्च – ७७० रुपये ’मार्चपासून सुरुवात

रुपे, यूपीआय देयकाकरिता शुल्क नाही

रुपे कार्ड, यूपीआयमार्फत होणाऱ्या देयक व्यवहारांकरिता येत्या १ जानेवारी २०२० पासून शुल्क लागू होणार नाहीत. अशा व्यवहारांसाठीचे ‘एमडीआर’ शुल्क रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी पुन्हा या निर्णयाची आठवण करून दिली. वार्षिक ५० कोटी उलाढाल असलेल्या कंपन्यांना तंत्रस्नेही सेवा प्रोत्साहनाकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पॅन-आधार ३१ मार्चपर्यंत संलग्न

पॅन अर्थात ‘परमनंट अकाऊंट नंबर’ हे वैश्विक अशा ‘आधार’ कार्डाबरोबर ३१ मार्च २०२० पर्यंत संलग्न करण्याकरिता मुदत आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी ही मुदत संपत होती. आठव्यांदा ही मुदतवाढ मिळाली आहे. प्राप्तिकर विवरणपत्रात १० आकडी पॅनबरोबरच संबंधित करदात्याचा १२ आकडी आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे करण्यासाठी संबंधित कार्डधारकाला प्राप्तिकर विभागाचा संकेतस्थळ मंच उपलब्ध करून देण्यात आला असून आधार कार्ड संलग्न झाल्यानंतर त्याबाबतची स्थितीही येथे पाहता येते. उभय कार्ड मुदतीत संलग्न न झाल्यास पॅन कार्ड कार्यान्वित होणार नाही; आधार कार्डशी संलग्न केल्यानंतर ते पुन्हा कार्यान्वित होईल.

‘ओटीपी’ आधारित एटीएम व्यवहार

स्टेट बँकेने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ग्राहकांना नव्या वर्षांत ‘ओटीपी’ आधारित एटीएम व्यवहार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेची ही सुविधा रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेसाठीच असेल; तसेच एटीएममधून एकाच वेळी काढण्यात येणाऱ्या १०,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेकरिताच ती लागू असेल. स्टेट बँकेच्या ग्राहकाने पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये कार्ड टाकल्यानंतर बँक खात्याशी संलग्न त्याच्या मोबाइलवर ‘ओटीपी’ आल्यानंतर त्याने तो एटीएमवरील संबंधित रकान्यात नमूद करावयाचा आहे. ‘ओटीपी’बरोबरच ‘पिन’ही अनिवार्य आहे. स्टेट बँकेव्यतिरिक्त अन्य बँकेच्या एटीएममध्ये कार्ड वापराकरिता मात्र ही ‘ओटीपी’ची सुविधा कार्यान्वित नसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 1:38 am

Web Title: important incident happened akp 94
Next Stories
1 केरळ विधानसभेच्या खास अधिवेशनात नागरिकत्व कायद्याविरोधात ठराव मंजूर
2 नव्या वर्षात रेल्वे प्रवास महाग, मुंबईकरांना भुर्दंड नाही
3 नव्या वर्षात रेल्वे प्रवास महाग, मुंबईकरांना भुर्दंड नाही; जाणून घ्या भाडेवाढ
Just Now!
X