केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशात सध्या करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मार्चपासून सुरूवात झालेली आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात केले जात आहे. तसेच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जात आहे.

४५ ते ५९ वर्षे वयाच्या ज्या व्यक्तींना कोमॉर्बिड आजार आहेत त्यांनी कोविन अॅपवर नाव नोंदवल्यावर, ते ज्या डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत, त्यांचे प्रशस्तीपत्रक घेऊन लसीकरण करावयाचे आहे. मात्र, यात समाविष्ट असलेल्या आजारांबाबात डॉ. अविनाश भोंडवे यांनी माहिती दिली आहे.

१. हृदयाच्या कार्यक्षमतेत दोष निर्माण झाल्यामुळे ज्यांना मागील १ वर्षात रुग्णालयात दाखल व्हायला लागले होते.
२. हृदयरोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, तसेच ज्यांच्या हृदयातील डाव्या जवनिकेमध्ये कृत्रिम उपकरण बसवून हृदयाचे स्पंदन आणि रक्ताभिसरण साधले जाते.
३. हृदयाच्या स्पंदनादरम्यान हृदयाचे आकुंचन होताना डाव्या जवनिकेचे कार्य कमालीचे कमी झाले आहे अशा व्यक्ती
४. हृदयाच्या अंतर्गत असलेल्या झडपांचा मध्यम गंभीर किंवा अति गंभीर आजार
५. जन्मजात हृदयविकार असलेल्या व्यक्तीत फुफ्फुसाकडे प्राणवायू विरहित रक्त पोचवणाऱ्या रोहिणी रक्तवाहिनीतील रक्तदाब खूप वाढलेला राहण्याचा आजार
६. ज्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोष निर्माण झालेला आहे आणि ज्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे किंवा ज्यांची बायपास शस्त्रक्रिया किंवा अँजिओप्लास्टी झालेली आहे आणि त्याचबरोबर ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचे उपचार सुरु आहेत.
७. ज्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे उपचार सुरु आहेत आणि त्याशिवाय हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याने ज्यांच्या छातीत अधूनमधून किंवा सतत दुखते.
८. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे उपचार सुरु असून शिवाय ज्यांना अर्धांगवायूचा त्रास झाला आहे आणि त्याचा पुरावा एमआरआय किंवा सिटीस्कॅनवर दिसून आलेला आहे.
९. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे उपचार सुरु असून शिवाय हृदयाकडून फुफ्फुसाकडे ऑक्सिजनविरहित रक्त नेणाऱ्या रक्तवाहिनीतील रक्तदाबही वाढलेला आहे.
१०. ज्या व्यक्तींना १० वर्षांपेक्षा जास्त काल मधुमेह असून त्यामधून गुंतागुंतीचे विकार निर्माण झाले आहेत आणि या बरोबरच ज्यांना उच्च रक्तदाबाचे उपचार सुरु आहेत.
११. ज्या व्यक्तींची यकृत किंवा मूत्रपिंडाच्या किंवा रक्त घटकांच्या आजारांसाठी/करोर्कगासाठी मगजातील मूळपेशींची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे किंवा ज्यांची या शस्त्रक्रियांसाठी प्रतीक्षायादीत नोंदणी झालेली आहे
१२. मूत्रपिंडे पूर्णपणे निकामी होऊन अंतिम स्थितीत आहेत त्यामुळे ज्यांच्यावर डायलिसिसचे उपचार सुरु आहेत.
१३. ज्यांना वैद्यकीय उपचारांसाठी दीर्घकाळ स्टीरॉइड्स किंवा प्रतिकारप्रणाली दबवणारी औषधे सुरु आहेत.
१४. अनियंत्रित अवस्थेतील लिव्हर सिऱ्होसिस
१५. श्वसनसंस्थेचे गंभीर आजार ज्यामध्ये गेल्या दोन वर्षात रुग्णाला इस्पितळात दाकःल व्हावे लागले आहे आणि ज्याची श्वसनाची क्षमता १५ टक्क्यांपर्यंत खालावलेली आहे.
१६. रक्ताचा कर्करोग, रसग्रंथीचा कर्करोग, हाडातील मगजाचा म्हणजेच अस्थिमज्जेचा कर्करोग
१७. १ जुलै २०२० नंतर ज्यांच्याबाबतीत गंभीर स्वरूपाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे किंवा ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्करोगाचे उपचार सुरु आहेत.
१८. लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिनचा आजार (सिकल सेल डिसीज), रक्तपेशी तयार करणाऱ्या हाडातील मगजाच्या कार्यात बिघाड होणे (बोन मॅरो फेल्युअर), अस्थिमज्जेमध्ये रक्तपेशी तयार न होण्यामुळे हिमोग्लोबिन कमी राहणारा आजार
१९. प्रतिकारप्रणालीमध्ये दोष निर्माण होणारे आजार किंवा एचआयव्ही-एड्सचा आजार
२०. बौद्धिक अकार्यक्षमता किंवा स्नायूंमध्ये अपंगत्व निर्माण करणारा जन्मजात आजार, किंवा अंगावर अॅसिड फेकल्यामुळे ज्यांच्या श्वसन संस्थेवर गंभीर विपरीत परिणाम झाल्यामुळे आलेले अपंगत्व; तसेच आधाराशिवाय ज्यांना कोणतीही हालचाल करता येत नाही असे अपंगत्व, मूक-बधीर व्यक्ती