रशियाच्या करोना प्रतिबंधक ‘स्पुटनिक व्ही’ लशीची आयात चालू तिमाहीत सुरू होणार आहे. यासाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने तयारी सुरू केली आहे.

एप्रिलअखेरपर्यंत ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या आयातीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. मात्र, या लसमात्रा वापरास उपलब्ध कधी उपलब्ध होतील, याचा निर्णय सरकारवर अवलंबून असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. या लशीच्या साठवणुकीसाठी असलेली उणे १८ अंश सेल्सिअसची अवस्था २ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत नेण्याची तयारी होत असल्याचे या औषध उत्पादक कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

ही लस रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडाकडून (आरडीआयएफ) आयात केली जाणार असून, भारताला लशीच्या १२५ दशलक्ष मात्रा पुरवण्याच्या करारांतर्गत उणे १८ ते उणे २२ अंश तापमान कायम राखून त्या येथे आणल्या जातील, असे डॉ. रेड्डीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सप्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.