जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने अनपेक्षितपणे पीडीपीचा पाठिंबा मागे घेत राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांचीच री नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ओढली आहे. ओमर अब्दुल्ला त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन नॅशनल कॉन्फरन्सला २०१४ च्या निवडणुकीत जनादेश मिळालेला नाही आणि २०१८ मध्येही आमच्याकडे जनादेश नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही पुढे येणार नाही किंवा कोणाला पाठिंबाही देणार नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही राज्यपालांना भेटून राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी केल्याचे स्पष्ट केले.

ओमर अब्दुल्लांच्या या निर्णयामुळे आता पीडीपीची नॅशनल कॉन्फरन्सला हाती घेऊन सरकार स्थापण्याचा पर्याय ही संपुष्टात आणला आहे. तत्पूर्वी, काँग्रेसनेही पीडीपीला पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये आता राज्यपाल राजवटीशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येते.

ओमर अब्दुल्ला यांनी दुपारी चारच्या सुमारास राज्यपाल एन एन व्होरा यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अब्दुल्ला म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्सला २०१४ च्या निवडणुकीत जनादेश मिळाला नाही. २०१८ मध्येही जनादेश मिळू शकला नाही. त्यामुळे आता आम्ही कोणाकडे जाणार नाही किंवा कोणाला पाठिंबाही देणार नाही.

सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याच पक्षाकडे सरकार स्थापण्याइतकी स्थिती नसल्याचे मी राज्यपालांच्या निर्दशनास आणून दिले आहे. त्यांनी राज्यात राज्यपाल राजवट लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यपाल राजवट दीर्घ काळापर्यंत नसावी, अशी विनंतीही मी राज्यपालांकडे केली आहे. कारण जनतेला त्यांचे सरकार निवडण्याचा अधिकार आहे. नव्याने निवडणुका व्हाव्यात आणि त्यावेळी जो जनादेश मिळेल तो आम्ही स्वीकारू, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले.