कोविड १९ लसीकरण शनिवार व रविवार बंद ठेवण्यात येणार असून या लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरची कोविन २.० आवृत्ती १ मार्चपासून वापरली जाणार आहे. आतापर्यंतचे लसीकरण १.० आवृत्तीवर करण्यात आले आहे.

१ मार्चपासून साठ वर्षांवरील व्यक्ती व ४५ वर्षांवरील सहआजार असलेल्या व्यक्तींना लस दिली जाणार आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांना याबाबत माहिती कळवण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की १६ जानेवारीला देशभरात लसीकरण सुरू करण्यात आले असून त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात आली. नंतर दोन फेब्रुवारीला आघाडीवर काम करणाऱ्या लोकांना लस देण्यात आली. आता देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत असून त्यात साठ वर्षे वयावरील व्यक्ती व सहआजार असलेल्या ४५ वर्षे वयावरील व्यक्ती यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी कोविन २.० ही संगणकीय आज्ञावली वापरण्यात येणार आहे. या बदलासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील कोविड लसीकरण सत्रे कोविन २.० वर घेतली जाणार आहेत. त्यात लाभार्थीना नावनोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. सोमवारपासून ही नोंदणी सुरू करण्यात येत आहे. या वेळी जवळच्या लसीकरण केंद्रात येऊनही तुम्ही लस घेऊ शकता. मात्र त्यासाठी तुमची ओळख पटवावी लागेल. साठ वर्षे वयावरील सर्व व्यक्तींना लस दिली जाणार असून ४५ वयावरील व्यक्तींना सहआजार असेल तर लस दिली जाणार आहे. सरकारी रुग्णालयात मोफत तर खासगी रुग्णालयात शुल्क आकारून लस दिली जाणार आहे.  लाभार्थीना १ मार्चपासून नोंदणी करता येणार आहे. जवळच्या केंद्रावर थेट नोंदणी करूनही लसीकरण करुन घेता येईल, अशी माहिती कोविड लसीकरण मोहिमेच्या सक्षम गटाचे प्रमुख आर.एस शर्मा यांनी दिली आहे.

तिसऱ्या  टप्प्यात सोमवारी  लसीकरण सुरू होत असून साठ वर्षे वयावरील व्यक्ती व ४५ वर्षे वयावरील सहआजाराच्या व्यक्तींना लस दिली जाईल. एकूण १० हजार सरकारी सुविधा व २० हजार खासगी रुग्णालये त्यासाठी सज्ज असतील.

नव्या आवृत्तीचे लाभ

* कोविनच्या नव्या आवृत्तीत जीपीएसची सुविधा केली असून लाभार्थी त्यांचे लसीकरणाचे ठिकाण निवडू शकतात. सरकारी व खासगी रुग्णालयांतूनही ठिकाण निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे. जे लोक थेट नोंदणीसाठी लसीकरण केंद्रात येतील त्यांना स्वयंसेवक तांत्रिक मदत करणार आहेत.

* दुसऱ्या राज्यातून आलेल्या व्यक्तीस ती सध्या ज्या राज्यात आहे त्या राज्यात लसीकरण करुन घेता येईल.

*  ४५ वर्षांवरील व्यक्तींना त्यांची सहआजाराची वैद्यकीय प्रमाणपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. पण कुठले सह आजार असलेल्या व्यक्तींना लस देणार हे अजून निश्चित करण्यात आलेले नाही.

* कोविनच्या मदतीने नोंदणी, लसीकरण वेळ हे सगळ आरोग्य सेतू व इतर साधारण सेवा उपयोजनाच्या मार्फत करता येणार आहे. मोबाईल  क्रमांक नोंदवल्यानंतर त्या व्यक्तीच्या खात्याचा ओटीपी तयार होईल. त्यानंतर त्याच खात्यावर कुटुंबातील इतरांची नोंदणी करता येईल.

कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वे ३१ मार्चपर्यंत कायम

कोविड-१९ बाबत सध्या अस्तित्वात असलेली मार्गदर्शक तत्त्वे ३१ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचे शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

करोनाचे उपचाराधीन रुग्ण आणि नव्याने लागण होण्याच्या प्रमाणात घट झाली असून करोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे गृहमंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.