भारताच्या नवनिर्वाचित पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आपल्या शपथविधीस बोलाविण्याची भूमिका स्तुत्य आहे. दक्षिण आशियातील या दोन देशांमधील संबंध सुधारणे या भागाच्या शांततेसाठी अत्यंत गरजेचे आहे, असे मत भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या चीनने व्यक्त केले आहे.
भारतात नवीन सरकार आल्यानंतर बदलणाऱ्या घडामोडींकडे आमचे लक्ष आहे, आणि आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो. या दोन राष्ट्रांमधील संबंध सुधारल्यास त्याचा केवळ त्या दोन देशांनाच फायदा होईल, असे नव्हे तर या भागातच शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शेजारी राष्ट्र म्हणून स्नेहभाव वाढीस लागलेला पाहायला आम्हाला नक्कीच आवडेल. या दोघांचे विकासाचे हितसंबंध समान आहेत आणि त्याचा दक्षिण आशियाई राष्ट्रांना नक्कीच फायदा होईल, असे चीनने म्हटले आहे.
पंतप्रधानपदी आरूढ होणाऱ्या नरेंद्र मोदी यांना चीनचे पंतप्रधान ली केकियांग मंगळवारी फोन करून त्यांना शुभेच्छा देणार आहेत, तसेच औपचारिकरीत्या त्यांचे अभिनंदनही करणार आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.