पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी २१ सदस्यांचे मंत्रिमंडळ जाहीर केले असून त्यातील अनेकांनी माजी अध्यक्ष मुशर्रफ यांच्या काळात महत्त्वाची पदे भूषवली होती. २१ नावे त्यांनी जाहीर केली असून त्यातील १६ मंत्री तर पाच जण सल्लागार असतील, अशी माहिती पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इम्रानखान यांचा देशाचे बाविसावे पंतप्रधान म्हणून शनिवारी शपथविधी झाला. चौधरी यांनी ट्विटरवर मंत्र्यांची यादी टाकली असून त्यात शहा महमूद कुरेशी यांना परराष्ट्रमंत्रिपद देण्यात आले. कुरेशी हे पक्षाचे उपाध्यक्ष असून ते २००८ ते २०११ दरम्यान पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होते. त्या वेळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईत दहशतवादी हल्ला केला होता. मुंबईत हल्ला झाला त्या वेळी ते दिल्लीत होते. परवेझ खट्टक यांना संरक्षणमंत्री करण्यात आले असून असाद उमर हे अर्थमंत्री झाले आहेत.

खट्टक यांनी २०१३ -१८ दरम्यान खैबर पख्तुनवा प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. असाद उमर हे माजी लेफ्टनंट जनरल महंमद उमर यांचे पुत्र असून जनरल उमर हे १९७१ च्या युद्धात पाकिस्तानी लष्करात सहभागी होते. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी अध्यक्षीय प्रासादात उद्या होणार आहे. यातील बारा जणांनी मुशरफ यांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे. मुशर्रफ यांचे माजी प्रवक्ते, वकील व अनेक  सदस्य या मंत्रिमंडळात आहेत.

मुशर्रफ यांच्या काळात काम केलेले फरोग नसीम, तारिक बशीर चिमा, गुलाम सरवर खान, झुबैदा जलाल, फवाद चौधरी, शेख रशीद अहमद, खालीद मकबूल सिद्दीकी, शफकत मेहमूद, मखदूम  खुस्रे बख्तियार, अब्दुल रझाक दाऊद, डॉ. इशरत हुसेन व अमीन असलम यांचा त्यात समावेश आहे. कुरेशी व खट्टक यांच्यासह पाच कॅबिनेट मंत्री हे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सरकारमधील आहेत.

शेख रशीद हे रावळपिंडीचे असून त्यांना रेल्वेमंत्री करण्यात आले आहे. ते मुशर्रफ मंत्रिमंडळात त्याच खात्याचे मंत्री होते. शिरीन मझारी, झुबैदा जलाल  व फेहमीदा मिर्झा हे खान यांच्या मंत्रिमंडळात आहेत. मंत्र्यांचा दर्जा असलेले  माजी बँकर इशरत हुसेन, उद्योगपती अब्दुल रझ्झाक दाऊद व बाबर अवान हे इम्रानखान यांच्या पाच सल्लागारांमध्ये  आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imran khan announces 21 member cabinet
First published on: 20-08-2018 at 01:23 IST