पंतप्रधानांच्या भव्य महालात मी राहणार नाही तर लहानशा घरात राहीन आणि पंतप्रधानांचा भव्य महाल शिक्षणसंस्थांसाठी वापरू अशी घोषणा पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती. मात्र, जिवाला धोका असल्यामुळे त्यांना पंतप्रधानांच्या त्या महालातच रहावे लागणार असल्याचे वृत्त आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी व सुरक्षा यंत्रणांनी इम्रान खान यांच्या घराची पाहणी केली तसेच सुरक्षेच्या दृष्टीने इम्रान व पक्षातील अन्य नेत्यांशी चर्चा केली. सुरक्षेच्या दृष्टीने इम्रान यांना इस्लामाबाद येथल्या पंतप्रधान निवासाच्या भव्य महालातच रहावं लागेल अशी लक्षणे या भेटीत दिसल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानच्या निवडणुकांमध्ये तहरीक ए पाकिस्तान हा इम्रान खान यांचा पक्ष सर्वात जास्त जागा जिंकून सत्तेचा दावेदार झाला आहे. क्रिकेटपटू म्हणून कारकिर्द गाजवलेले इम्रान खान लवकरच पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, आपण वेगळे पंतप्रधान असू हे सांगताना 26 जुलै रोजी सरकारी मंत्र्यांचे सगळे भव्य थाट बंद होतील असे इम्रान म्हणाले. आपण साध्याच घरात राहू व सगळी सरकारी भव्य निवासस्थानं जनतेला अर्पण करू असंही खान यांनी सांगितलं होतं.

पण आता या सगळ्याकडे मात्र भारतीय लोक वेगळ्याच नजरेनं बघत आहेत. आपचे माजी नेते कुमार विश्वास यांनी माने ये बी शुरू? इतकंच म्हणत यांचाही केजरीवाल झाला? असा अर्थ निघेल असं ट्विट केलं. त्यानंतर सोशल मीडियावर केजरीवाल यांचा पाकिस्तानी अवतार अशा थाटात नेटिझन्सनी इम्रान खान यांच्यावर टिका करायला सुरूवात केली आहे.