भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये वारंवार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आसाममधील एनआरसीची अंतिम यादी समोर आल्यानंतर मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एनआरसी हा मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या व्यापक कटाचा एक भाग असल्याचे टि्वट इम्रान खान यांनी केले आहे.

काश्मीर मुद्दावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्णपणे एकाकी पडलेल्या इम्रान खान यांच्याकडून भारतावर वाटेल तसे आरोप करण्यात येत आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार मुस्लिमांना संपवण्याच्या मोदी सरकारच्या नितीची जगभरात दखल घेतली गेली पाहिजे. भारताने काश्मीरचा मिळवलेला बेकायदा ताबा हा मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या व्यापक कटाचा भाग आहे असे टि्वट इम्रान खान यांनी केले आहे.

एनआरसीची अंतिम यादी त्यांनी आपल्या टि्वटमध्ये टॅग केली आहे. मागच्या आठवडयात इम्रान खान यांनी टि्वट करुन सध्याचे भारतातील सरकार फॅसिस्ट, जातीयवादी, नरसंहार आणि नाझी विचारांना मानणारे असल्याचा आरोप केला होता.

इम्रान खान काय म्हणाले न्यूयॉर्क टाइम्समधील लेखात

काश्मीरप्रश्नी जगातील कोणीही हस्तक्षेप केला नाही तर अण्विक शक्ती असलेले दोन्ही देश युद्धाच्या जवळ पोहोचतील. काश्मीर मुद्द्यावरील चर्चेत प्रामुख्याने काश्मीरी लोकांना सहभागी केलं पाहिजे. परंतु भारताशी चर्चा तेव्हाच होईल, जेव्हा भारत काश्मीरवरील अवैधरित्या असलेला ताबा सोडेल. तसंच सैन्य परत बोलावेल आणि कर्फ्यू काढेल, असं इम्रान खान यांनी नमूद केलं आहे. द न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखातून त्यांनी भारताला इशारा दिला.