हंदवाडामध्ये दोन दिवसात दोन वेगवेगळया घटनांमध्ये कर्नल, मेजरसह एकूण आठ जवान शहीद झाले. या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा भारताने दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या टेन्शनमध्ये आहेत. इम्रान खान यांनी टि्वट करुन आपली चिंता व्यक्त केली आहे.

“सध्या तणावग्रस्त परिस्थिती आहे. तिचा फायदा घेत, घुसखोरी होत असल्याचा आरोप भारताकडून होण्याची शक्यता आहे. तसेच याच्या आडून भारत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाईचा बागुलबोवा उभा करण्याची शक्यता आहे,” असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. काश्मीरमधील अस्वस्थततेमागे पाकिस्तान आहे असा आरोप भारताने केल्यानंतर इम्रान खान यांनी हे टि्वट केले आहे.

दोन्ही बाजूंमध्ये शाब्दीक वादावादी सुरु झाली आहे. “पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाईचा बागुलबोवा उभा करण्यासाठी भारत सातत्याने कारणं शोधत आहे. नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी होत असल्याचा आरोप तथ्यहीन असून भारताच्या खतरनाक अजेंडयाचा भाग आहे” असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. काश्मीरमध्ये स्थानिक हिंसाचार घडवत असल्याचा उलटा आरोप त्यांनी केला.

भारतातील सत्ताधारी म्हणजे भाजपाच्या धोरणांमुळे दक्षिण आशियातील शांतता धोक्यात येऊ शकते असा आरोपही त्यांनी केला. “भारताच्या बेजबाबदार वर्तनामुळे दक्षिण आशियातील शांतता धोक्यात येऊ शकते. त्याआधी आंतरराष्ट्रीय समुदायाने पावले उचलावी” असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.