06 August 2020

News Flash

पाकिस्तानकडून पुन्हा युद्धाची भाषा

इम्रान खान यांनी चर्चेची शक्यता फेटाळली

(संग्रहित छायाचित्र)

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर भारताशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही; आता दोन्ही देशांत युद्ध होण्याची शक्यता असून त्याची व्याप्ती उपखंडापलीकडे असेल, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी केली.

भारताने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याने हा प्रश्न आम्ही संयुक्त राष्ट्रांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. इतरही आंतरराष्ट्रीय मंचांवर हा मुद्दा जाहीरपणे मांडला. आता आंतरराष्ट्रीय समुदायाने काही तरी कारवाई करणे अपेक्षित आहे, असे इम्रान म्हणाले. भारताशी युद्धाची शक्यता आहे, पण युद्ध झालेच तर त्याचे पर्यवसान शोकांतिकेत होईल. शिवाय, युद्ध भारतीय उपखंडापलीकडेही पसरण्याची शक्यता आहे, असा इशारा त्यांनी दिला. पाकिस्तान युद्धाला तोंड फोडणार नाही, कारण आम्ही नेहमीच समेटाची भूमिका घेतली आहे. आम्ही युद्धविरोधी आहोत, युद्धाने प्रश्न सुटत नाहीत, अशी पुष्टीही इम्रान खान यांनी जोडली.

‘अल् जझिरा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान म्हणाले, ‘‘भारत आणि पाकिस्तान हे दोन अण्वस्त्रधारी देश आहेत. त्यांच्यात पारंपरिक युद्ध झाले तर त्यातून अणुयुद्धाचाही धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याचा आपण विचारही करू शकत नाही. पाकिस्तान जर पारंपरिक युद्धात पराभूत होत असल्याचे चित्र दिसले तर आमचे लोक देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी प्राणाचे बलिदान देतील.’’

पाकिस्तानने भारताशी संवाद सुरू करण्याचा प्रयत्न अनेकदा केला. काश्मीर प्रश्नावर राजकीय तोडगा काढून मतभेद मिटवावेत असेच आमच्यासारख्या सुसंस्कृत शेजारी देशाला वाटते. भारताने पाकिस्तानला आर्थिक कृती दलाच्या (एफएटीएफ) काळ्या यादीत टाकण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले तर पाकिस्तानवर र्निबध लागू होऊन पाकिस्तान दिवाळखोरीत जाईल, असा भारताचा होरा आहे. त्यासाठी भारत प्रयत्नही करीत आहे. तेथील सरकार पाकिस्तानला मागे रेटण्याचे काम करीत आहे, असा आरोपही इम्रान यांनी केला.

भारताने कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर आता त्या देशाशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळ ठरावाचा अवमान करून भारतात काश्मीरचे बेकायदा विलीनीकरण केले आहे, असेही इम्रान म्हणाले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, असे भारताने वारंवार स्पष्ट केले असून पाकिस्तान बेजबाबदार विधाने करीत आहे. भारतविरोधी भावना भडकावण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे, असेही भारताने म्हटले आहे.

पाकच्या गोळीबारात यंदा २१ भारतीयांचा बळी

नवी दिल्ली : पाकिस्तानी लष्कराने या वर्षी शस्त्रबंदीचे २०५० वेळा उल्लंघन केले असून त्यात २१ भारतीयांचा मृत्यू झाला, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी रविवारी दिली. भारताने २००३ मधील शस्त्रबंदीचे पालन करण्याचे आवाहन करूनही पाकिस्तानने कराराचे उल्लंघन करणे सुरूच ठेवले आहे.

काश्मीरमधील मुलांना सुरक्षितपणे शाळेत पाठवा – मलाला

लंडन : काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करून तेथील मुलांना तणावग्रस्त परिस्थितीतून मार्ग काढून शाळेत जाण्यासाठी मदत करावी, असे आवाहन नोबेलविजेत्या पाकिस्तानी शिक्षण हक्क कार्यकर्त्यां मलाला युसुफझाई यांनी केले आहे. ‘काश्मीरमधील लोकांचे म्हणणे ऐकावे. तसेच मुलांना सुरक्षित शाळेत पाठवण्याची व्यवस्था करावी,’ असे युसुफझाई यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 1:29 am

Web Title: imran khan dismisses the possibility of discussion abn 97
Next Stories
1 सौदी अरेबियातून तेलपुरवठा घटणार
2 उत्तर प्रदेश, हरयाणातही राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची चाचपणी
3 माजी खासदारांना बंगले सोडवेनात!
Just Now!
X