३० कोटी डॉलरचे सा रद्द

दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यात कमी पडल्याने अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी ३०० दशलक्ष डॉलरची लष्करी मदत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ ५ सप्टेंबर रोजी पाकिस्तानचा दौरा करून नवे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी अमेरिकेने हा निर्णय जाहीर केला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जाहीर केलेल्या नव्या दक्षिण आशिया धोरणात पाकिस्तानवर ताशेरे ओढले होते. आजवर अमेरिकेने केलेल्या मदतीच्या बदल्यात पाकिस्तानकडून केवळ भूलथापा आणि फसवणूकच मिळाली आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान अन्य प्रदेशातील दहशतवाद्यांना मदत करणे थांबवत नाही. अफगाण तालिबान, हक्कानी नेटवर्क आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी गटांना पाकिस्तानच्या भूमीत अद्याप आश्रय मिळत आहे.

या गटांवर नियंत्रण मिळवण्यात पाकिस्तानचे प्रयत्न कमी पडत आहेत. या कारणापायी ट्रम्प प्रशासनाने जानेवारीत पाकिस्तानला दिली जाणारी १.१५ अब्ज डॉलरची मदत रद्द केली होती. आता आणखी ३०० दशलक्ष डॉलरची मदत थांबवण्यात येत आहे, असे पेंटॅगॉनचे प्रवक्ते कोन फॉकनर यांनी सांगितले. त्यासाठी पेंटॅगॉनने अमेरिकी काँग्रेसची परवानगी मागितली आहे.