पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नोबेल पुरस्कार विजेते भारताचे महान कवी रविंद्रनाथ टागोर यांची कविता लेबनानी-अमेरिकी कवी खलील जिब्रान यांची असल्याचे सांगितल्याने त्यांना ट्रोल व्हावे लागले. बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ही कविता पोस्ट केली होती.


ट्विटरवर रविंद्रनाथ टागोरांच्या कवितेचे श्रेय खलील जिब्रानला दिल्याने इम्रान खान ट्रोल झाले. लोक त्यांच्यावर इतके भडकले की त्यांनी इम्रान खान यांना आपले ज्ञान वाढवण्याचा सल्ला दिला. एका युजरने तर मोहम्मद अली जिना यांचे छायाचित्र लावत इम्रान खान यांच्यावतीने रविंद्रनाथ टागोर यांची माफी मागणारा संदेशच टॅग केला.

इम्रान खान यांनी इंग्रजीत टागोरांच्या कवितेची एक प्रेरणादायी ओळ आणि त्याखाली खलील जीब्रानचे नाव आणि फोटो अशी पोस्ट प्रसिद्ध केली. या ओळीचा मराठीत अर्थ असा होतो की, ‘मी झोपी गेलो आणि स्वप्न पाहिलं की, जीवन आनंद आहे. मी जागा झालो आणि पाहिलं की जीवन सेवा आहे. मी सेवा केली आणि मला जाणवलं की सेवेतच आनंद आहे.’  कवितेच्या या ओळीनंतर इम्रान यांनी कॅप्शनमध्ये असेही लिहीले की, जे लोक जिब्रानच्या शब्दांमध्ये ज्ञान शोधतात आणि मिळवतात ते अशा प्रकारे समाधानी जीवन प्राप्त करतात.

इम्रान यांच्या या ट्विटवर गुरुवारी सकाळपर्यंत २८ हजार लाईक्स मिळाले होते. तर त्याला ६३०० पेक्षा अधिक लोकांनी रिट्विटही केले होते, तर ३ हजारांहून अधिक लोकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या होत्या. यामध्ये बऱ्याच लोकांनी रविंद्रनाथ टागोरांच्या फोटोसह त्यांच्या कवितेची ही ओळ असलेले फोटोही पोस्ट केले होते.