संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या प्रश्नावर घेतलेल्या अनौपचारिक बैठकीचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले,की काश्मीर प्रश्नावर तोडगा काढणे ही संयुक्त राष्ट्र संघटनेची जबाबदारी आहे.

ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे, की गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळासारख्या मोठय़ा राजनैतिक मंचावर काश्मीर प्रश्नी चर्चा झाली असून ही स्वागतार्ह बाब आहे.

काश्मीरमधील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने आतापर्यंत एकूण ११ ठराव केलेले असून त्यावर आताच्या बैठकीने शिक्कामोर्तब झाले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.  इम्रान खान यांनी या बैठकीचे स्वागत केले असले तरी या बैठकीनंतर सुरक्षा मंडळाच्या वतीने निवेदन करण्याची चीनची मागणी सर्व १५ सदस्यांनी फेटाळली होती.  कलम ३७० बाबतचे मुद्दे हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याची भूमिका भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अक बरूद्दीन यांनी स्पष्ट केली. पाकिस्तानने सुरक्षा मंडळाची  बैठक यशस्वी झाल्याचा दावा केला असला तरी त्याची कुठलीही अधिकृत फलनिष्पत्ती नाही, कारण ती बैठक अनौपचारिक असल्याने त्याचे कुठलेही इतिवृत्त नाही.