भारत-पाकिस्तान द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याची मागणी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्यात ही चर्चा व्हावी, असेही इम्रान खान यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

याच महिन्यात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेची बैठक होणार असून तेव्हा स्वराज आणि कुरेशी यांच्यामध्ये चर्चा होणार का, या बाबत साशंकता होती. मात्र इम्रान खान यांनी मोदी यांना पत्र पाठविल्याने ही चर्चा होण्याची शक्यता आता बळावली आहे. इम्रान खान यांचे पत्र म्हणजे दोन्ही देशांदरम्यान चर्चेचा औपचारिक प्रस्ताव असल्याचे मानले जात असून २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेली द्विपक्षीय चर्चा पुन्हा सुरू करण्याचे आवाहन या पत्रामध्ये करण्यात आले आहे.

पठाणकोट हवाई तळावर दहशतवादी हल्ला करण्यात आल्यानंतर ही चर्चा बंद करण्यात आली होती. दहशतवाद आणि काश्मीर यासह अन्य मुद्दय़ांवर दोन्ही देशांनी चर्चेद्वारे तोडगा काढला पाहिजे, असेही या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

मोदी यांनी इम्रान खान यांना १८ ऑगस्ट रोजी पत्र पाठविले होते. दहशतवादमुक्त दक्षिण आशियासाठी एकत्रित काम करण्याची गरज आहे, असे मोदी यांनी पत्रात म्हटले होते. इम्रान खान यांनी मोदी यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी ट्वीट केले आहे.

मोदींकडून प्रतिसाद मिळण्याची पीडीपीला आशा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले आहे, त्याला मोदी प्रतिसाद देतील अशी आशा पीडीपीने व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमधील प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा हात एकमेव मार्ग आहे, असे पीडीपीने म्हटले आहे.

इम्रान खान यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल पीडीपीने त्यांचे अभिनंदन केले आहे. मोदी तुम्हाला प्रतिसाद देतील अशी आशा आहे, असे पीडीपीने अधिकृत ट्विटरवर म्हटले आहे.

सुषमा स्वराज- शाह कुरेशी न्यूयॉर्कमध्ये भेटणार

संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज आणि त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ शाह महमूद कुरेशी यांची बैठक होणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.

मात्र या बैठकीमुळे, भारताच्या पाकिस्तानबाबतच्या धोरणात कुठलाही बदल होणार असल्याचे संकेत मिळत नाहीत. पाकिस्तानच्या विनंतीवरून ही बैठक होत आहे, असे मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.

न्यूयॉर्कमधील दोन्ही देशांचे कायम राजदूत या बैठकीची तारीख ठरवणार आहेत. तथापि, या बैठकीच्या अजेंडय़ाला मात्र अंतिम रूप देण्यात आलेले नाही, असेही कुमार म्हणाले. संयुक्त राष्ट्र संघ सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने होणाऱ्या सार्क देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीतही स्वराज सहभागी होणार असल्याची माहिती कुमार यांनी दिली. ही सर्वसाधारण सभा २५ सप्टेंबरला सुरू होणार असून ती ९ दिवस चालेल.