पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मत; कर्तारपूर मार्गिकेची पायाभरणी

भारताशी पाकिस्तानला मजबूत व सुसंस्कृत असे संबंध हवे आहेत, निर्धार केला तर काश्मीरसह सर्व प्रश्न दोन्ही देश सोडवू शकतात, यात शंका नाही, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कर्तारपूर मार्गिकेच्या पायाभरणी प्रसंगी केले. पाकिस्तानातील कर्तारपूरचे दरबार साहिब व गुरुदासपूर जिल्ह्य़ातील डेराबाब नानक या दोन धर्मस्थळांना जोडणारी ही मार्गिका असणार आहे.

भारतीय शीख भाविकांना तेथे व्हिसा शिवाय जाता येणार आहे. या कार्यक्रमास पंजाबचे मंत्री नवजोत सिंग सिद्धू, पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर व हरदीप पुरी उपस्थित होते.

इम्रान खान म्हणाले, की भारतबरोबरचे संबंध पुढे सरकले पाहिजेत असे आम्हाला वाटते. जर फ्रान्स व जर्मनी या एकमेकाशी अनेक युद्धे लढणाऱ्या देशांत मैत्री व शांतता निर्माण होत असेल, तर भारत व पाकिस्तान यांच्यात ती का निर्माण होऊ शकत नाही. पाकिस्तान व भारत यांना देवाने दिलेल्या संधी समजत नाहीत. जेव्हा मी भारताला भेट देतो, तेव्हा  पाकिस्तानशी मैत्रीबाबत आमची एकजूट आहे पण लष्कर या मैत्रीत अडथळा आणते, असे तेथील राजकीय नेते सांगतात. आमच्यात तसे नाही. लष्कर, राजकीय नेते व सर्वानाच भारताशी मैत्री हवी आहे. आम्ही पुढे जाऊ इच्छितो. आम्हाला सुसंस्कृत असे मैत्रीचे संबंध हवे आहेत. काश्मीर हा केवळ एक प्रश्न आहे. माणूस जर चंद्रावर चालू शकतो तर आपण सोडवू शकत नाही असे कोणते प्रश्न असू शकतात. आपण हे प्रश्न सोडवू शकतो, त्यासाठी निर्धार व मोठी स्वप्ने हवीत. समजा व्यापार सुरू झाला, दोन्ही देशांतील संबंध चांगले झाले, तर दोन्ही देशांना किती फायदा होईल याचा विचार करा. भारताने एक पाऊल पुढे टाकले तर पाकिस्तान मैत्रीसाठी दोन पावले टाकेल, दोन्ही देशांनी चुका केलेल्या आहेत पण याचा अर्थ दोन्ही देशांनी या भूतकाळात रमावे असा नाही. भूतकाळाची जोखडे टाकली नाहीत, एकमेकांवर आरोप बंद केले नाहीत, तर दोन्ही देश याच स्थितीत राहतील पण दोन्ही देशांतील संबंध सुधारले पाहिजेत असे आम्हाला वाटते. दोन्ही देशांतील नागरिकांना शांतता हवी आहे, आता दोन्ही देशांच्या नेत्यांनी त्यावर एकत्र काम केले पाहिजे.

‘मला आज तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. मुस्लीम बांधवांना हा आनंद समजून सांगायचा तर मदिनापासून चार कि.मी. अंतरावर आलो आहोत व आपण तेथे जाऊ शकत नाही पण आता तेथे जाण्याची संधी निर्माण झाली आहे. त्याचा जो आनंद असेल तोच शीख बांधवांना झाला आहे.’ असे इम्रान खान यांनी सांगितले.

ते म्हणाले, की गुरू नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त कर्तारपूर साहिब येथे आणखी सुविधा दिल्या जातील. कर्तारपूर साहिब येथे तुमच्यासाठी सतत सुधारणा केल्या जातील. कर्तारपूर साहिबसारखे अनेक पुढाकार दोन्ही देशातील शांततेसाठी गरजेचे आहेत. पंजाबचे मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांनी सांगितले, की आता हिंसाचार पुरे झाला, नवीन मार्गिका या दोन्ही देशांदरम्यान शांततेच्या संधी निर्माण करणार आहे.

केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी सांगितले, की जर बर्लिनची भिंत पडू शकते, तर भारत व पाकिस्तान यांच्यातील वैमनस्य व अविश्वास संपला पाहिजे. या मार्गिकेमुळे दोन्ही देशात शांतता व आनंदाचे वातावरण तयार होईल, असे त्यांनी भावविवश होत सांगितले.

इम्रान व सिद्धू यांची एकमेकांवर स्तुतिसुमने

इम्रान खान म्हणाले, की माझ्या शपथविधीच्या वेळी नवजोत सिद्धू येथे आला होता. तो शांतीचा संदेश घेऊन आला होता पण येथून तो भारतात परत गेला, तेव्हा त्याच्यावर भारतात टीका झाली. त्यामुळे मलाही वाईट वाटले. तो माझा सच्चा मित्र आहे, त्यामुळे तर ते अधिकच लागले. सिद्धू पाकिस्तानतही लोकप्रिय आहे. तो पाकिस्तानातून विशेष करून आमच्या पंजाबमधून सहज निवडणुकीत विजयी होईल याची मला खात्री आहे. पण दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी सिद्धू भारताचा पंतप्रधान व्हावा, अशी शुभकामना मी देतो पण भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी तो पंतप्रधान होईपर्यंत वाट पाहण्याइतका वेळ नाही.

२१ वर्षे मी क्रिकेट खेळलो. २२ वर्षे राजकारण केले. या वर्षांत मला सिद्धूसारखा मित्र मिळाला, त्यातूनच अजून मानवता जिवंत आहे हे पटले. सिद्धू या कार्यक्रमाला आल्याने पाकिस्तानात भारत उभा आहे, असे वाटत आहे. बुधवारच्या या कार्यक्रमात सिद्धूही जोशात होता. त्याने सांगितले, की मी नानक साहिबांचा शांती संदेश घेऊन आलो आहे.

इम्रान खान खरोखर दिलदार आहे. या ऐतिहासिक मार्गिकेबाबत लिहिले जाईल, तेव्हा इमरान खानचे नाव प्रथम घेतले जाईल. या वेळी सिद्धूने एक कविताही सादर केली. सरोवरात हंस व बगळे दोन्ही असतात. यात हंस मोती शोधतो तर बगळा मासे शोधत असतो, असे सांगून सिद्धू म्हणाला, की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देवदूतासारखे आहेत. पूर्वीचा काळ आठवतो. ज्या वेळी वडील हयात होते, त्या वेळी मी लहान होतो, तेव्हा पंजाब मेल लाहोपर्यंत जात असे पण ती आता पेशावर, अफगाणिस्तानपर्यंत जावी असे मला वाटते.

खलिस्तानी दहशतवाद्याची उपस्थिती

करतारपूर मार्गिकेचे कौतुक होत असले, तरी त्याचा दुरुपयोग पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी करू शकतो किंबहुना त्या हेतूनेच त्यांनी या मार्गिकेला लगेच परवानगी दिली. बुधवारच्या कार्यक्रमास पाकिस्तानातील दहशतवादी हाफिज सईद याचा सहकारी असलेला खलिस्तानी दहशतवादी गोपाल चावला हा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यासमवेत उपस्थित होता. त्याने बाजवा यांच्याशी हस्तांदोलनही केले, असे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.